...अन् आरोपीच्या घरासमोरच नेऊन ठेवला वृद्धाचा मृतदेह; बोर्डा दीक्षित गावात तणावाची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 11:02 AM2023-04-06T11:02:56+5:302023-04-06T11:02:56+5:30

क्षुल्लक वादावरून वृद्धाची हत्या, सहा जणांना अटक

old man killed over petty dispute, six arrested: Tension in Borda Dixit village of chandrapur | ...अन् आरोपीच्या घरासमोरच नेऊन ठेवला वृद्धाचा मृतदेह; बोर्डा दीक्षित गावात तणावाची स्थिती

...अन् आरोपीच्या घरासमोरच नेऊन ठेवला वृद्धाचा मृतदेह; बोर्डा दीक्षित गावात तणावाची स्थिती

googlenewsNext

पोंभुर्णा (चंद्रपूर) : शेतातील तणसाच्या ढिगातील चारा बैल खात असल्यामुळे बैलमालकाला काही जणांनी बेदम मारहाण केली. यात बैलमालक वृद्धाचा मृत्यू झाला. मारहाणीची घटना मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बोर्डा दीक्षित गावाच्या शेतशिवारात घडली व मृत्यू बुधवारी पहाटे झाला. घटनेनंतर बुधवारी आरोपींना अटक करून तत्काळ फाशीची शिक्षा द्या किंवा तसे आश्वासन लेखी द्या, या मागणीसाठी मृतकाच्या कुटुंबीयांनी मृतदेह चक्क आरोपीच्या घरासमोर नेऊन ठेवला. यामुळे गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनीही घरासमोर चोख बंदोबस्त ठेवला आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेह आरोपीच्या घरासमोरच होता. किसन लिंगाजी कुमरे (७५, रा. बोर्डा दीक्षित) असे मृत वृद्धाचे नाव आहे. पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा दीक्षित येथील किसन कुमरे यांचे बैल शेतातील तणसाच्या ढिगाऱ्यामधून चारा खात होते.

बैलाचा बंदोबस्त करण्याच्या किरकोळ वादावरून व पूर्ववैमनस्यातून काही जणांनी किसन कुमरे यांना मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास लाठीकाठीने बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत त्यांना घरी आणण्यात आले. मात्र, रात्रीची वेळ असल्याने कुटुंबीयांनी त्यांना झोपू देत बुधवारी दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, बुधवारी पहाटे त्यांना बघितले असता त्यांचा मृत्यू झाला होता. बुधवारी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. मात्र, कुटुंबीयांनी मृतदेह आरोपीच्या घरासमोर नेऊन ठेवला. जोपर्यंत आरोपींना अटक व फाशीची शिक्षा होणार नाही, तोपर्यंत मृतदेह हटविणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बोर्डा दीक्षित गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गावाला छावणीचे स्वरूप

मृतदेह दिवसभर आरोपीच्या घरासमोर ठेवल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती पोलिसांना होताच शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिस, आरसीबीची टीम व दंगा नियंत्रण पथक तैनात केले होते. शंभराच्या आसपास पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गावात छावणीचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्ह्यातील पाच आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली.

केशव गेलकीवार (५५), दामोदर गेलकीवार (४०), अक्षय गेलकीवार (३०), शुभम गेलकीवार (२३), तुळशीदास गेलकीवार (२०, सर्व रा. बोर्डा दीक्षित) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींविरुद्ध कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ व ॲट्राॅसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कल्पना केशव गेलकीवार यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: old man killed over petty dispute, six arrested: Tension in Borda Dixit village of chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.