बापरे, चक्क गावातील एका घरात बिबट्याची प्रसूती, तीन बछड्यांना दिला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 09:27 AM2024-08-05T09:27:51+5:302024-08-05T09:28:02+5:30
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बाळापूर येथे बिबट्याचा चांगलाच धुमाकूळ सुरू होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बिबट चक्क गावात येऊन एका घरात प्रसूत झाली. तिने तीन बछड्यांना जन्म दिला. नागभीड बतालुक्यातील बाळापूर खुर्द येथे सोमवारी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बाळापूर येथे बिबट्याचा चांगलाच धुमाकूळ सुरू होता. या कालावधीत वाघाने गावात येऊन लोकेश ठवरे, काशिनाथ तरोणे, दीलीप सोनकर, शंकर वाटकर, मंगेश गोंगल व आणखी काही गावकऱ्यांची बकऱ्या, गायी आणि बैल ठार केले होते. बिबट्याच्या या कारवायांनी गावकरी चांगलेच दहशतीत आले होते.
या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळीच ही बिबट एका घरातून बाहेर पडताना एका व्यक्तीस दिसली. त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी घरात येऊन चौकशी केली असता घराच्या एका कोपऱ्यात तीन बछडे दिसून आले. लागलीच सरपंच कमलाकर ठवरे यांनी ही माहिती वनविभागास दिली. वनविभागाचे अधिकारी बाळापूर येथे दाखल झाले आहेत. ज्या घरात बिबट प्रसूत झाली त्या घरात कोणीही राहत नव्हते.