ऐन दिवाळीत पोलिसांचा तिसरा डोळा झाला आंधळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 01:58 PM2024-11-06T13:58:07+5:302024-11-06T14:00:31+5:30
मूल शहरातील वास्तव : अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद
शशिकांत गणवीर
लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव : गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व गुन्हेगारांचा तत्काळ शोध घेण्याच्या दृष्टीने मूलनगर परिषद व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, येथील अर्ध्यापेक्षा अधिक कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पोलिसांचा तिसरा डोळा आंधळा झाला म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मे २०१५ रोजी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सीसीटीव्ही सव्हिलन्स सिस्टिम व नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले. मूल शहरात एकवीस दिवसांत ४५ कॅमेरे लावण्याचा विक्रम केला होता. मात्र, कॅमेऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, यातील अर्धेअधिक कॅमेरे बंद स्थितीत आहेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून यासाठी पोलिस बंदोबस्ताची गरज मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता ठाण्यात असल्याने अनुचित घडलेल्या घटनांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याने नजर ठेवण्यास मदत होते. मात्र, अनेक महिन्यांपासून सीसीटीव्ही बंद असल्याने गुन्हेगारांवर वचक ठेवण्याकरिता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
३० पेक्षा अधिक कॅमेरे बंद
शहरातील मुख्य ठिकाणी एकूण ४४ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, आजघडीला निवडकच कॅमेरे सुरू असून जवळपास तीसहून अधिक कॅमेरे बंद स्थितीत आहेत. त्यामुळे कॅमेरे बंद असलेल्या भागात चोरीच्या किंवा इतर घटना घडल्यास त्याचा उलगडा लावण्यास पोलिस प्रशासनाला अडचणीचे ठरत आहे.
दुचाकी व इतर चोरीच्या घटनांत वाढ
मागील सहा महिन्यांत शहरातील अनेक प्रभागांत घरफोडीच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. तसेच प्रशासकीय कामासाठी शहरात आलेल्या नागरिकांच्या अनेक दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. तसेच बसस्थान- कामध्ये व आठवडे बाजारात पाकीट मारणारे व मोबाइल चोरीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
"नगरपरिषदेच्या वतीने व काही मूल पोलिस प्रशासनाच्या वतीने शहरांमध्ये गुन्हेगारीवर आळा घालता यावा म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यातील पोलिस स्टेशनतंर्गत असलेले कॅमेरे सुरू आहेत. तर नगर परिषदेच्या वतीने लावलेले कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला आहे. काही दिवसातच दुरुस्त करून कार्यान्वित होतील."
- सुमित परतेकी, पोलिस निरीक्षक, मूल