ज्या दिवशी होती हळद, त्याच दिवशी रचावे लागले तिचे सरण !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 04:43 PM2024-04-29T16:43:38+5:302024-04-29T16:44:50+5:30

हळद लागण्यापूर्वीच घेतला जगाचा निरोप: विसापुरातील घटनेने हेलावले समाजमन

On the day before her wedding, she died of jondis | ज्या दिवशी होती हळद, त्याच दिवशी रचावे लागले तिचे सरण !

Died a day before her marriage

लोकमत न्यूज नेटवर्क
विसापूर :
जो आवडत होता, त्याच्याशीच तिचे लग्न जुळले. भावी आयुष्याचे स्वप्न ती रंगवत होती. एक दिवसानंतर तिचा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते. २८ एप्रिलला तिची हळद होती. परंतु, निर्दयी काळाने त्याच वेळी तिचा श्वासच हिरावून नेला. हळदीच्याच दिवशी तिचे सरण रचण्याची वेळ तिच्या बापावर आणली. निःशब्द होऊन वडील व भावी पती तिच्या मृतदेहाकडे एकटक पाहातच होते. हे पाहून गावकऱ्यांचेसुद्धा डोळे पाणावले.


ही दुर्दैवी घटना बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे घडली. वैशाली महादेव गेडाम (२४) असे मृत पावलेल्या भावी वधूचे नाव आहे. तिला काविळ आजार झाला होता. मात्र, उपचारादरम्यान नागपूर येथील एम्स रुग्णालयात २७ एप्रिलला सायंकाळी ८:०० वाजता तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 


वैशालीचा विवाह तिला आवडत असलेल्या गावातीलच जय टेकाम या युवकासोबत २९ एप्रिल २०२४ ला विसापूर येथे होणार होता. आठ दिवसांपूर्वी तिचे पोट खूप दुखत होते. अचानक जास्त अस्वस्थता वाटत असल्याने तिला चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. चार दिवस तिच्यावर उपचार झाल्यावरही प्रकृतीत पाहिजे तशी सुधारणा झाली नसल्याने डॉक्टरांनी तिला काविळसदृश आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने तिला नागपूर येथील एम्स रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. तिथे तिच्यावर चार दिवस उपचार चालला होता, परंतु, प्रकृती आणखीनच खालावत होती. २७ एप्रिलला लग्नकार्य असल्याने तिला हळद लावण्याचा कार्यक्रम आयोजित होता. मात्र, त्याच दिवशी सायंकाळी तिची प्रकृती खूपच गंभीर झाली. ही बाब गावकऱ्यांना माहीत झाल्यावर तिच्या उपचारासाठी सर्वांनी यथाशक्ती आर्थिक मदत केली. परंतु, त्या मदतीचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर रात्री ८:०० वाजता उपचाराला दाद देणे तिने बंद केले आणि तिची प्राणज्योत मालवली.

सर्वांचेच अश्रू अनावर
शर्थीचे प्रयत्न करूनसुद्धा आपण तिला वाचवू शकलो नाही, या विवंचनेत तिचे वडील व भावी पती निःशब्द होऊन तिच्या मृतदेहाकडे एकटक पाहात होते. ज्या दिवशी तिची हळद होती, त्या दिवशी तिचे सरण रचण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे पाहून परिसरातील नागरिकांचे अश्रू अनावर झाले होते.
 

Web Title: On the day before her wedding, she died of jondis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.