पहिल्या दिवशी बैलगाडीतून काढली विद्यार्थ्यांची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2023 08:00 PM2023-06-30T20:00:08+5:302023-06-30T20:00:32+5:30
Chandrapur News शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्या विद्यार्थ्यांचे बैलबंडीवर बॅण्ड पथकाच्या साहाय्याने वाजतगाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. तर कुठे पुष्पगुच्छ देऊन शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
चंद्रपूर : दोन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्या संपून शुक्रवारी जिल्ह्यातील दोन हजार ४७२ शाळेची पहिली घंटा वाजली. पहिल्याच दिवशी सवंगड्यांना भेटल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. दोन महिने शांत असलेला शालेय परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्या विद्यार्थ्यांचे बैलबंडीवर बॅण्ड पथकाच्या साहाय्याने वाजतगाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. तर कुठे पुष्पगुच्छ देऊन शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
दरवर्षी शाळा २६ जून रोजी सुरू व्हायची. मात्र यंदा पहिल्यांदाच शिक्षण विभागाने ३० जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार उन्हाळी सुट्या संपल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर शुक्रवारी शाळेची पहिली घंटा वाजली. प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सवाची धूम बघायला मिळाली. शिक्षकांसह शालेय समितीतील पदाधिकाऱ्यांनी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, बँड पथकाच्या निनादात स्वागत केले. अनेक शाळा सुशोभित करण्यात आल्या होत्या. मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांची शाळांच्या परिसरात गर्दी झाली होती. अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने थोडा वेळ का होईना पण आई-बाबांपासून दूर राहायचे या कल्पनेने या मुलांना रडू कोसळले होते, तर काही मुले नवीन मित्रांशी गट्टी जमविताना दिसून आले.
पहाटेच रिक्षावाला काका घरी
शाळेच्या पहिल्याच दिवशी रिक्षावाल्या काकांचेही काम सुरू झाले. सकाळी साडेसहा वाजल्यापासून रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा धावू लागल्या होत्या. विद्यार्थीही रिक्षावाल्या काकांची वाट पाहत, सकाळीच तयारी करून घराबाहेर उभे होते. बऱ्याच दिवसांनंतर जुने मित्र भेटल्याचा आनंद मुलांमध्ये होता.
कुठे हसू तर कुठे आसू
शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत मित्र मिळाले म्हणून अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. तर नवप्रवेशीत मुलांना आपल्या आईवडिलांपासून काही वेळ दूर राहावे लागत होते. म्हणून डोळ्यात आसू दिसून येत होते. आईवडिलांनी समजूत घालून मुलांना शाळेत पाठवल्याचे दिसून आले.
विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
जिल्हा परिषद शाळा शुक्रवारपासून सुरू झाले. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शिक्षकांकडून तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवही साजरा केला जाणार आहे. विशेषत: अनेक शाळेत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी काढून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यात आला.