पक्ष, मन अन् मतभेद विसरून त्यांनी केली मने मोकळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 02:04 PM2022-04-23T14:04:16+5:302022-04-23T14:15:35+5:30

केवळ संवाद नव्हे, तर सुसंवादात हा चंद्रपूर जिल्ह्यातील मान्यवरांचा स्नेहमिलन सोहळा प्रत्येकांसाठी कायम स्मरणात राहावा असाच होता.

On the occasion of the golden jubilee year of 'Lokmat', a get-together was organized at Chandrapur | पक्ष, मन अन् मतभेद विसरून त्यांनी केली मने मोकळी!

पक्ष, मन अन् मतभेद विसरून त्यांनी केली मने मोकळी!

Next
ठळक मुद्दे‘लोकमत’च्या व्यासपीठावर रंगली अशीही गप्पांची राजकीय मैफल

चंद्रपूर : पक्षभेद, मनभेद, मतभेद, हेवेदावे सोडून सारेच नेते एका व्यासपीठावर येतात आणि गप्पांची मैफल रंगतात. मने मोकळी करतात. मनुष्य विचाराने वेगळा असला तरी तो मनाने माणूसच आहे याचा प्रत्यय चंद्रपूरकरांना आला तो ‘लोकमत’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त गुरुवारी ए. डी. हाॅटेलच्या सभागृहात आयोजित स्नेहमिलन सोहळ्यात.

नाव स्नेहमिलन असले तरी हा सोहळा मनोमिलनाचा ठरला. या साेहळ्याचे मुख्य आकर्षण होते लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा. ते येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांची मोठ्या आस्थेने विचारपूस करीत होते. कधी गप्पा रंगत होत्या, तर कधी हास्याचे कारंजे उडत होते. भाषणबाजी नाही. केवळ संवाद नव्हे, तर सुसंवादात हा चंद्रपूर जिल्ह्यातील मान्यवरांचा स्नेहमिलन सोहळा प्रत्येकांसाठी कायम स्मरणात राहावा असाच होता.

सोहळ्याची वेळ सायंकाळी सहा वाजताची होती. जिल्ह्याच्या कोनाकोपऱ्यांतील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह राजकीय नेतेमंडळींचे अगदी सहा वाजल्यापासूनच येणे सुरू झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सर्वप्रथम कार्यक्रमस्थळी पोहोचले. काही क्षणांतच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आपले महत्त्वाचे दौरे रद्द करून कार्यक्रमस्थळी दाखल झाले आणि दोनही आजी-माजी पालकमंत्री खुर्चीला खुर्ची लावून गप्पांमध्ये रंगले. काही वेळातच या स्नेहसोहळ्याचे होस्ट लोकमतचे एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा पोहोचले. त्यांच्यासोबत खासदार बाळू धानोरकर हेदेखील आले. ही मंडळीही मंत्री वडेट्टीवार व आमदार मुनगंटीवार यांच्यासोबतच गप्पांमध्ये रंगली. कधी हास्याचे कारंजे उडत होते. अशातच राजुराचे आमदार सुभाष धोटे हेही तेथे आले. तेही या गप्पांत रममाण झाले.

प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मित्ताली सेठी ही मंडळी आधीच या गप्पांमध्ये सहभागी झाली होती. अशातच वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल व त्यापाठोपाठ आमदार किशोर जोरगेवार यांचीही तेथे एंट्री झाली. राजकीय नेत्यांमध्ये नेहमीच कलगीतुरा बघायला मिळतो. चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणही याला अपवाद नाही.

अलीकडेच खासदार आणि पालकमंत्र्यांमध्ये काहीतरी बिनसले, असे वातावरण काँग्रेसमध्ये बघायला मिळत होते, तर आझाद गार्डनला नुतनीकरणानंतर लोकांसाठी आझाद करण्यावरून आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार आमने-सामने आले होते. ही पार्श्वभूमी सर्वांना स्नेहमिलन सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवरांना आधीच माहिती होती.

या सर्वांचे नेत्यांच्या गप्पांकडे नव्हे, तर कोण कोणाला चिमटे काढतात याकडेच लक्ष लागले होते. परंतु, हे सर्व हेवेदावे, पक्षभेद, मतभेद, मनभेद विसरून ‘लोकमत’च्या व्यासपीठावर एकमेकांजवळ आपले मन मोकळे करीत होते. हा क्षण भविष्यात चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी नक्कीच कामी येईल, ही बाब यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांमध्ये चर्चेचा विषय बनली होती.

Web Title: On the occasion of the golden jubilee year of 'Lokmat', a get-together was organized at Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.