‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त प्रेमीयुगुलांना पोलिसांचा असाही सबुरीचा सल्ला
By परिमल डोहणे | Published: February 14, 2023 11:44 AM2023-02-14T11:44:49+5:302023-02-14T11:53:23+5:30
हेल्मेटचे हृदय स्वत:सह जोडीदाराच्या सुरक्षेसाठी धडधडतेय : एसपीचा उपक्रम
चंद्रपूर : ‘व्हॅलेंटाइन वीक’दरम्यान चाॅकलेट डे साजरा करून येताना सिंदेवाही-मूल मार्गावर एका तरुण-तरुणीचा अपघाती मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला. मंगळवारी व्हॅलेंटाइन डे आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने प्रेमीयुगुलांना एका फलकाच्या माध्यमातून सबुरीचा आणि सावधगिरीचा सल्ला दिला आहे.
७ फेब्रुवारीपासून ‘व्हॅलेंटाइन वीक’ला सुरुवात झाली. तरुणांमध्ये मोठा उत्साह आहे. या दिवसात आपल्या हृदयातील भावना साथीदारांना तरुण कळवत असतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनीसुद्धा दोन हेल्मेटचे हृदय काढत ‘प्रोटेक्ट युवरसेल्फ अँड युवर पार्टनर’ असे हेल्मेट वापरण्यासंदर्भातील जनजागृतीपर संदेशाचे बॅनर लावले आहे. व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर लावलेले हे बॅनर चर्चेचे ठरत आहे.
सन २०२२ मध्ये झालेल्या अपघातात मृत्यू पडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक मृत्यूमध्ये विना हेल्मेटधारकांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या नेतृत्वात वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी वाहतूक पोलिस विविध उपक्रम राबवित आहेत. विना हेल्मेटधारकांसह, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येत आहे. तरीसुद्धा विना हेल्मेट फिरणाऱ्यांची संख्या वाढतानाच दिसत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ‘व्हॅलेंटाइन वीक’मध्ये हेल्मेटचे हृदयरूपी बॅनर काढून त्यावर ‘प्रोटेक्ट युवर सेल्फ अँड युवर पार्टनर’ असा भावनिक संदेश लिहित शहरातील सावरकर चौक, महाकाली चौक, बंगाली कॅम्प, वाहतूक शाखा परिसरात बॅनर लावले आहेत. हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या भावनिक हाकेला काहीजण प्रतिसादही देत असल्याचे दिसून येत आहे.
चालानपेक्षा जनजागृतीवर भर
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिस चालान करून दंड आकारत असते. चालकांना शिस्त लावण्याच्या मुख्य उद्देश असतो. तरीसुद्धा अनेकजण विना हेल्मेट वाहन परिधान करून फिरताना दिसून येतात. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वात वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यापेक्षा जनजागृतीवर अधिक भर दिला असून चालकांना भावनिक आधार दिला आहे.
विना हेल्मेटधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हेल्मेटबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने व वाढत्या अपघाताला आळा घालण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी भावनिक आवाहन करणारे असे बॅनर चौका-चौकांत लावले आहेत. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करतच वाहन चालवावे.
- प्रवीणकुमार पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक, चंद्रपूर