वन अकादमीत आपत्ती निवारण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 11:55 PM2018-02-08T23:55:07+5:302018-02-08T23:56:06+5:30
येथील वन प्रबोधिनी संकूल परिसरात लवकरच वन वणवा व नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्र उभे राहणार आहे. यासाठी स्वतंत्र इमारत, मूलभूत संरचनेसह बांधकाम करण्याबाबतच्या सात कोटी २३ लाख २७ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : येथील वन प्रबोधिनी संकूल परिसरात लवकरच वन वणवा व नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्र उभे राहणार आहे. यासाठी स्वतंत्र इमारत, मूलभूत संरचनेसह बांधकाम करण्याबाबतच्या सात कोटी २३ लाख २७ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शासनाच्या महसूल व वनविभागाने गुरुवारी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता, हे विशेष.
केंद्र शासनाच्या आपत्ती निवारण विषयक योजनेची महाराष्ट्रातदेखील अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने चंद्रपूर वन प्रबोधिनी संकूल परिसरात वन वणवा व नैसर्र्गिक आपत्ती निवारण केंद्रासह स्वतंत्र इमारत, मुलभूत संरचनेसह बांधकाम करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. त्याअनुषंगाने प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन व प्रशिक्षण) यांनी शासनाला प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या केंद्राबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे कार्यकारी संचालक अनिल गुप्ता यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन केंद्र यशदा, अग्नी सुरक्षा प्रशिक्षण महाविद्यालय नागपूर आदींसह या केंद्राचे स्वरूप निश्चित करण्याच्या दृष्टीने उच्चस्तरीय बैठक घेतली होती. वनविभागाचे नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्र हे ज्ञान केंद्र झाले पाहिजे, तेथे नैसर्गिक आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण, यासंबंधीचे संशोधने झाले पाहिजे.
या केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणारे प्रशिक्षण वर्ग, इतर कोर्सेस याचे एक उत्तम मॉडेल तयार करण्यात यावे व त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान अत्याधुनिक व परिपूर्ण असावे तसेच त्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षीत मनुष्यबळाचा विचार केला जावा, अशी भूमिका ना. मुनगंटीवार यांनी या बैठकीदरम्यान मांडली होती. दरम्यान, हे केंद्र देशातीलच नव्हे तर आशियातील सर्वोत्तम केंद्र ठरेल, असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रात होणार ही कामे
या केंद्रात नियमित प्रशिक्षण, पूर, वन वणवे, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देणे. एखादा बिबट विहिरीत पडला किंवा गावातील एखाद्या घरात घुसला तर त्याची सुटका कशी करायची, या परिस्थितीत लोकांनी नेमके कसे वागायचे, याचादेखील त्यात समावेश असणार आहे. वातावरणीय बदलामुळे वनातील काही वृक्ष प्रजाती, वन्यजीव प्रजाती नाहिशा होत आहेत, त्याचे रक्षण कसे करायचे, याचादेखील या आपत्ती निवारण केंद्रात अभ्यास करता यावा, यादृष्टीने या केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.