सवलतीच्या धान्यापासून दीड लाख नागरिक मुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:21 AM2021-06-01T04:21:36+5:302021-06-01T04:21:36+5:30
साईनाथ कुचनकार चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्राधान्य, तसेच अंत्योदय कार्डधारकांना मोफत धान्य दिले. मात्र एपीएल केशरी कार्डधारक ...
साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्राधान्य, तसेच अंत्योदय कार्डधारकांना मोफत धान्य दिले. मात्र एपीएल केशरी कार्डधारक यापासून वंचित होते. त्यांनाही जून महिन्यात सवलतीच्या दरात धान्य देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. मात्र मागील वर्षी अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मे ते ऑगस्टपर्यंतच्या शिल्लक साठ्यातून धान्य देण्यात येणार आहे. हा साठा केवळ ५५ हजार लाभार्थ्यांना पुरेल एवढाच असल्याने उर्वरित दीड लाख लाभार्थ्यांना सवलतीच्या दरातील धान्यापासून मुकावे लागणार आहे.
जिल्ह्यात ४ लाख ५७ हजार ३२९ एकूण रेशनकार्डधारक आहेत. त्यात प्राधान्य गटामध्ये २ लाख ६१ हजार ३१ कार्डधारक तर १ लाख ३७ हजार १४५ अंत्योदय कार्डधारक आहे. दरम्यान, ५९ हजार १५३ केशरी कार्डधारकांची संख्या असून एकूण २ लाख २ हजार ३२४ लाभार्थी या अंतर्गत येतात. राज्य शासनाने घोषित केल्याप्रमाणे एपीएल कार्डधारकांना जून महिन्यात सवलतीच्या दरात प्रति लाभार्थी एक किलो गहू ८ रुपये, एक किलो तांदूळ १२ रुपये किलोप्रमाणे प्रत्येक लाभार्थ्याला देण्यात येणार आहे. यासाठी मागील वर्षी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी योजना घोषित केली होती. यामध्ये मे ते ऑगस्ट २०२० या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता. या धान्यातून उचल न केलेले धान्य शिल्लक आहे. तेच धान्य या वर्षी एपीएल केशरी कार्डधारकांना वितरित केले जाणार आहे. सद्य:स्थितीत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २५.४७३ मे टन तांदूळ तसेच २९.६०५ मे टन गहू असे एकूण ५५.०७८ मे टन धान्य शिल्लक आहे. या धान्यातून २ लाख २ हजार ३२४ लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे यातील केवळ ५५ हजार लाभार्थ्यांनाच यातून लाभ मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांचे काय, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.
बाॅक्स
एपीएल केशरी कार्डधारक संख्या
५९,१५३
एकूण लाभार्थी
२,०२,३२४
मागील वर्षीचे शिल्लक धान्य
५५.०७८ मे. टन
तांदूळ -२५.४७३ मे. टन
गहू २९.६०५ मे. टन
बाॅक्स
प्रथम मागणी करणाऱ्यास प्राधान्य
एपीएल केशरी कार्डधारकांना शासनाने जाहीर केलेल्या सवलतीचे धान्य प्रथम मागणी करणाऱ्यांना प्रथम या तत्त्वानुसार देण्यात येणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांमध्ये सकाळपासून रांगा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स
घ्यावी लागणार दक्षता
राज्य शासनाने सवलतीच्या दरात धान्य देण्याचे घोषित केले असतानाच खराब किंवा मानवी खाण्यास अखाद्य अन्नधान्याचे वितरण होणार नाही, याचीही पुरवठा विभाग तसेच रास्तभाव दुकानदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.
बाॅक्स
भांडण होण्याची शक्यता
सवलतीच्या दरामध्ये धान्य मिळणार आहे. मात्र धान्यसाठा अत्यल्प आणि लाभार्थी अधिक असल्यामुळे स्वस्त धान्य दुकानांमध्ये गर्दी होऊन भांडण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.