एक कोटीची नळयोजना रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:34 AM2018-05-11T00:34:44+5:302018-05-11T00:34:44+5:30
एक कोटी रुपये खर्चून नळयोजना उभारण्यात आली. मात्र, वर्धा नदी पात्रात पाणीच नसल्याने शहरातील विविध वॉर्डांत जलसंकट निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे.
बी. यू. बोर्डेवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : एक कोटी रुपये खर्चून नळयोजना उभारण्यात आली. मात्र, वर्धा नदी पात्रात पाणीच नसल्याने शहरातील विविध वॉर्डांत जलसंकट निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे.
शहरात ३ हजार नळधारक आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठ्यासाठी नळयोजना सुरू करण्यात आली. पण, पाणीच मिळत नसल्यामुळे भर उन्हाळ्यात शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. गुरुवारी सोमनाथपूर, नेहरु चौक वॉर्डासह अन्य काही वॉर्डांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला़ राजुरा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन वर्धा नदीच्या पात्रात सोडून त्याद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. परंतु नदीचे पाणी आटल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. शहराला लागून असलेले निजामकालीन तलावसुद्धा आटत आहे. पाणीच मिळत नसल्याने थंड पाण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. शुद्ध पाण्याच्या नावाखाली व्यवसाय करणाऱ्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. विंधन विहिरीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. नगर परिषदेने दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून पर्यायी स्त्रोत तयार केले नाहीत. वर्धा नदीच्या भरोशावरच असल्याने ही समस्या निर्माण झाली. वाढती गरज लक्षात घेऊन न. प. ने. नियोजन केल्याशिवाय समस्या सुटणार नाही.