नोंदणी व मुद्रांक अधिकाऱ्यांच्या संपाने एक कोटींचा महसूल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:31 AM2021-09-23T04:31:28+5:302021-09-23T04:31:28+5:30
चंद्रपूर : नोंदणी व मुद्रांक विभागातील अराजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे जिल्ह्यातील १६ नोंदणी ...
चंद्रपूर : नोंदणी व मुद्रांक विभागातील अराजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे जिल्ह्यातील १६ नोंदणी कार्यालयातील दस्त नोंदणी पूर्णपणे बंद होती. संपामुळे शासनाचा एक कोटी रुपयांचा महसूल ठप्प झाला आहे. दरम्यान, संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. बुधवारीही हे आंदोलन सुरूच होते.
नोंदणी व मुद्रांक विभागातील अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने सर्व संवर्गातील पाच ते सहा वर्षांपासून रखडलेली पदोन्नती, रिक्त पदे भरणे, कोरोनाने मृत्यू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी संघटनेचा मागील काही वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र, केवळ त्यांना आश्वासन देण्यात येत आहे. त्यामुळे संघटनेच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. मात्र, याचा फटका शासनाच्या महसुलावर पडत आहे. खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्याने एक कोटींचा महसूल ठप्प पडला आहे. बुधवारी नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी, कर्मचारी संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बी. एन. माहोरे, सचिव विकास बोरकर, एस. व्ही. रामटेके, एन. एन. राजपूरकर, व्ही. आर. झाडे, बी. एन. रणदिवे, बी. ए. जिवने, आर. एस. नागपूरे, एस. यू. पाटील, पी. पी. चिडे, ए. टी. राठोड, पी. एच. राऊत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत.