वरोरा पंचायत समितीसाठी एक कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 10:25 PM2018-11-03T22:25:35+5:302018-11-03T22:25:55+5:30
राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वरोरा पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या फर्निचर व अंतर्गत सुविधेच्या कामांसाठी एक कोटी रूपये किमतीच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वरोरा पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या फर्निचर व अंतर्गत सुविधेच्या कामांसाठी एक कोटी रूपये किमतीच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरोरा येथील नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
वरोरा पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येवून सदर इमारतीत पंचायत समितीचे कामकाज कार्यान्वित करण्यात आले आहे. वरोरा पंचायत समितीच्या नविन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या मुळ प्रस्तावास मॉडयुल फर्निचर व अंतर्गत सुविधा तसेच परिसर विकास या बाबींचा समावेश केलेला नसल्यामुळे पंचायत समिती प्रशासनाने याबाबत मागणी केली. वरोरा येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर ही मागणी मांडण्यात आली. त्यांनी सदर सुविधांसाठी तातडीने निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन जाहीरपणे दिले होते. त्यांनी दिलेल्या निदेर्शांच्या अनुषंगाने शासनाला याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला.
त्यानुसार वरोरा पंचायत समितीच्या नविन प्रशासकीय इमारतीच्या फर्निचर व अंतर्गत सुविधांच्या कामासाठी एक कोटी रू. निधीच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. वरोरा नगर परिषद क्षेत्रातसुध्दा अर्थमंत्र्यांच्या पुढाकाराने निधी मंजूर करण्यात आला असून अनेक विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजनसुध्दा करण्यात आले आहे.