एक दिवस शेतकऱ्यांसाठी, शेतकरी पुत्र करणार उपोषण
By साईनाथ कुचनकार | Published: March 18, 2024 05:26 PM2024-03-18T17:26:40+5:302024-03-18T17:27:42+5:30
उपोषण करण्याचे आवाहन, १९ मार्च १९८६ रोजी विदर्भात पहिली शेतकरी आत्महत्या.
साईनाथ कुचनकार, चंद्रपूर : दि. १९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे पाटील या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाणच्या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली. ही विदर्भातील पहिली शेतकरी आत्महत्या होती. त्यानंतर आजवर हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकार बदलले पण आजही शेतकऱ्याचे मरण थांबले नाही. सर्वांचा अन्नदाता असलेला शेतकरीच आज उपाशी मरत आहे. त्याच्यासाठी मंगळवार, दि.१९ मार्च रोजी आपापल्या घरी किमान एक दिवस अन्नत्याग करून शेतकऱ्यासाठी उपवास करण्याचे आवाहन, अन्नदाता एकता मंंच, पाथ फाउंडेशनसह विविध गावांतील सरपंच, उपसरपंचांसह संस्था, संघटनांनी केले आहे.
आपल्या आत्महत्येने बदल होईल, असे साहेबरावांना वाटत होते; पण तसे आजपर्यंत काही घडले नाही. उलट शेतकरी आत्महत्यांच्या साखळीने महाराष्ट्र आजही ग्रासलेला आहे. आपणही शेतकरीपुत्र आहोत, तीच व्यथा घेऊन १९ तारखेला एक दिवस उपोषण करून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून एक दिवस उपोषण करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. चेतन खुटेमाटे, पाथ फाउंडेशन अध्यक्ष ॲड. दीपक चटप, अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष संदीप कुटेमाटे, संस्थापक अनुप कुटेमाटे, उपसरपंच सुनील मोरे, सरपंच महेंद्र भोयर, सरपंच सविता जमदाडे, मोहन दर्वे, अमोल क्षीरसागर, पंढरी कुटेमाटे, धनराज भोयर, अभिषेक भोयर, वैभव भोयर, प्रवीण आवारी, विनोद ठोंबरे, विजय मत्ते, योगेश मत्ते, योगेश कुटेमाटे, अक्षय कुटेमाटे, पंकज कावळे, गौरव नांदे, जयेश डाखरे, वैभव चौधरी या किसान पुत्रांनी केली आहे.