पूर्वसूचना न देता एक दिवसाआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:47 PM2019-04-14T22:47:29+5:302019-04-14T22:48:10+5:30
नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सध्या चंद्रपुराते एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. काही वॉर्डात तर दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मात्र याची नागरिकांना कल्पना नसल्याने नागरिकांना ऐनवेळी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे चंद्रपुरातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सध्या चंद्रपुराते एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. काही वॉर्डात तर दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मात्र याची नागरिकांना कल्पना नसल्याने नागरिकांना ऐनवेळी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे चंद्रपुरातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत.
उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे चंद्रपुरातील पाणी पुरवठ्याचे कंत्राट आहे. चंद्रपुरात नेहमीच पाणी पुरवठ्यात अनियमिता राहिली आहे. दरवर्षीच चंद्रपुरात पाण्यासाठी बोंबा मारल्या जातात. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने इरई धरणात पाण्याचा साठा कमी आहे. मात्र उन्हाळ्यात हा जलसाठा चंद्रपूरकरांना पुरु शकतो. मागील वर्षी इरई धरणाची याहून बिकट स्थिती होती. तेव्हा महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपुरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा का, यासाठी सभा घेतली होती. सर्व विचाराअंती सभेत शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यंदा थोडी स्थिती बरी आहे. तरीही मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय शहरातील तुकूम परिसर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, बाबुपेठ परिसर, नगिना बाग आदी भागात तर दोन-दोन दिवस नळ येत नाही.
विशेष म्हणजे, शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याबाबतचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे की कंत्राटी कंपनीने परस्पर हा निर्णय घेतला आहे, हेच नागरिकांना समजेणासे झाले आहे. मनपाने हा निर्णय घेतला असेल तर त्याची पूर्वसूचना नागरिकांना दिली नाही. त्यामुळे तयारीत नसलेल्या नागरिकांना ऐनवेळी न आल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
पाणी पुरवठाही कमी
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात सध्या पाणीसाठा असला तरी पाणी पुरवठा करताना तो मुबलक केला जात नाही. कुठे एक तास तर कुठे त्याहून कमी पाणी येते. त्यातही धारही मोठी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. काही भागात तर केवळ अर्ध्या तासातच नळाची धार गुल होते, अशाही तक्रारी आहेत.