दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू; ताडोबामधील चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 11:10 AM2023-02-28T11:10:22+5:302023-02-28T11:11:49+5:30
घटनास्थळाचा पंचनामा करून वाघाचा मृतदेह उपचार केंद्रात हलविण्यात आला
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रांतर्गत असलेल्या चंद्रपूर परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३७८ मध्ये एका नर वाघाचा मृतदेह आढळला. ही घटना रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास निदर्शनास आली. वनविभागाने सोमवारी ही घटना उघड केली. दोन वाघांच्या झुंजीत एका नर वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कक्ष क्रमांक ३७८ मधील ३० हेक्टर मिश्र रोपवनातील टीसीएममध्ये रविवारी गस्तीदरम्यान एका वाघाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त होताच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफरचे उपसंचालक, सहायक वनसंरक्षक, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणचे बंडू धोत्रे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करून वाघाचा मृतदेह उपचार केंद्रात हलविण्यात आला.
सोमवारी वाघाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. यानंतर मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, उपसंचालक बंडू धोत्रे, वनपरिक्षेत्र अधिकारी भांडककर, वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसकर,पशुवैद्यकीय अधिकारी खोब्रागडे उपस्थित होते. वाघाचा मृत्यू दोन वाघांच्या झुंजीत झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.