शंभर वर्षांचा ‘तो’ पूल धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:22 PM2017-10-29T23:22:31+5:302017-10-29T23:22:46+5:30
राजुरा लगतच्या वर्धा नदीवरील चेन्नई - दिल्ली मार्गावरील रेल्वे पुलाला जवळपास शंभर वर्ष पूर्ण होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : राजुरा लगतच्या वर्धा नदीवरील चेन्नई - दिल्ली मार्गावरील रेल्वे पुलाला जवळपास शंभर वर्ष पूर्ण होत आहे. या ब्रिटीशकालीन रेल्वे पुलामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठवून लक्ष वेधल्यामुळे लवकरच रेल्वे प्रशासन नवीन पुलाच्या दिशेने पाऊल उचलण्याची शक्यता आहे.
ब्रिटीश राजवटीत हा पूल तयार आला असून भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल वर्षभराने याच पुलावरुन सैनिक पाठवून राजुरा तालुका निजामांच्या राजवटीमधून मुक्त केला. एकाच पिल्लरवर हा पूल तयार करण्यात आला असून अनेक ठिकाणी भेगा पडल्यामुळे यावर करोडो रुपये खर्च करुन डागडूजी करण्यात आली. रेल्वेचे डब्बे वाढले, वेग वाढला. मागील शंभर वर्षापासून निरंतरपणे दररोज अनेक रेल्वेगाड्या जात असतात. अतिशय कमी वेगात या पुलावरुन गाड्या चालविण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. या मार्गावर चेन्नई - दिल्ली मार्गावरील सर्वच प्रमुख गाड्या धावत असून रेल्वेपुलाजवळील पिल्लर लगतचे दगड बरोबर नसून नट-बोल्ट जंगलेले आहे. या पुलावरुन ये-जा करणाºया १२० च्या जवळपास प्रवासी रेल्वे गाड्या धावत असून ७५ मालगाड्या धावतात. चेन्नई- दिल्ली मार्गावरील सर्व गाड्या जुन्याच रेल्वे पुलावरुन धावत असल्यामुळे केव्हा अपघात घडून येईल, याची शक्यता नाकारता येत नाही. जवळच बल्लारपूर रेल्वे जंक्शन असून शेकडो गाड्यामधील रेल्वे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या धोकादायक पुलाचे काम तातडीने हाती घेण्याबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधले आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.