आॅटोरिक्षा अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:29 AM2017-10-25T00:29:10+5:302017-10-25T00:29:21+5:30
येथून भरगच्च प्रवाशी भरून जात असलेला अॅटोरिक्षा पोंभुर्णा जवळील टर्निंग पॉर्इंटवर उलटल्याने एक ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी ४ वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : येथून भरगच्च प्रवाशी भरून जात असलेला अॅटोरिक्षा पोंभुर्णा जवळील टर्निंग पॉर्इंटवर उलटल्याने एक ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी ४ वाजता घडली. गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीस जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. तर ११ जखमींवर पोंभुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून यातील पाच जखमी रुग्णांना चंद्रपूर येथे हलविण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नथुजी आलाम (४०) जाम तुकुम असे मृत प्रवाशाचे नाव आहे. पोंभुर्णा येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरते. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिक व महिला भाजीपाला खरेदीसाठी पोंभुर्णा येथे जात असतात. यामार्गे अनेक अॅटो धावत असतात. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने एका आॅटोमध्ये १५ ते १६ प्रवासी जनावरांसारखे कोंबुन नेत असतात.
अशातच मंगळवारी देवाडा खुर्द- जामतुकुमकडे धावणारा एमएच ३४ डी ५८०५ या क्रमांकाचा करण सुरजागडे यांचा टर्निंग पॉर्इंटवर उलटला. या आॅटोमध्ये देवाडा खुर्द, जामखुर्द व जामतुकुम येथील १६ प्रवासी होते. अपघातात नथुजी आलाम हे गंभीर जखमी झाले. त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.
तर उज्वला अविनाश भडके, अविनाश भडके, सपना पुरुषोत्तम कोहळे, अरूनाबाई बुरांडे, उषा मानकर, हायसला कन्नाके, संस्कार पेन्दोर, इंदिरा पेन्दोर, सुमन सिडाम, भोजराज टोंगे, तुकाराम भलवे या ११ जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा येथे उपचार सुरू आहे. यातील ५ प्रवाशांना गंभीर दुखापत असल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात येणार असल्याचे कार्यरत डॉक्टरनी सांगितले. वृत्त लिहीपर्यंत पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नव्हती.
लोकप्रतिनिधींची भेट
अॅटो उलटल्याने ११ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळताच पोंभूर्णा पंचायत समितीचे उपसभापती विनोद देशमुख, पं.स. सदस्य ज्योती बुरांडे, नगरसेवक जयपाल गेडाम, तेजराज मानकर, गणेश वासलवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा येथे जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.