चाकू हल्ल्यात एक ठार

By admin | Published: July 17, 2016 12:32 AM2016-07-17T00:32:11+5:302016-07-17T00:32:11+5:30

येथून जवळच असलेल्या नागापूर फाट्यावर १५ जुलै रोजी रात्री ८.१५ च्या दरम्यान पालडोह येथील ...

One killed in a knife attack | चाकू हल्ल्यात एक ठार

चाकू हल्ल्यात एक ठार

Next

एक जखमी : दुचाकीस्वारांना नागापूर फाट्याजवळ अडविले
जिवती : येथून जवळच असलेल्या नागापूर फाट्यावर १५ जुलै रोजी रात्री ८.१५ च्या दरम्यान पालडोह येथील शिवाजी नामदेव गिते (३८) व विजय भाऊराव राठोड हे दोघेही दुचाकीने जिवतीकडे येत असताना फाट्यावर दडून बसलेल्या अज्ञात आरोपींनी चाकू हल्ला केला. त्यात शिवाजी नामदेव गिते याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर विजय भाऊराव राठोड जखमी झाले.
शिवाजी गिते व विजय राठोड हे दोघेही पालडोह येथील रहिवासी असून शुक्रवारी रात्री ८ वाजतादरम्यान पाण्याची मोटार बिघडल्याने दोघेही दुचाकीने पालडोहवरुन जिवतीकडे मेकॅनिकला घेवून जाण्यासाठी निघाले होते. रस्त्यावरच्या नागापूर फाट्यावर आधीच दडून बसलेल्या अज्ञात दोन आरोपींनी शिवाजी गिते व विजय राठोड यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर धारधार शस्त्राने सपासप वार करून शिवाजी गिते यांची हत्या केली. तर विजय राठोड यांना खांद्यावर व मांडीवर चाकूने वार केल्याने तेही जखमी झाले. जखमी अवस्थेतच विजय राठोड यांनी नागापूर गावाकडे धाव घेत नातेवाईकांना फोनने बोलावले. तोपर्यंत अज्ञात आरोपी दुचाकीने पसार झाले.
या घटनेची माहिती तात्काळ जिवती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार जिवती पोलिसांनी घटनास्थळ गाठून शिवाजी नामदेव गिते यांचा मृतदेह ताब्यात घेतला. जखमी विजय राठोड यांना उपचारासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध जिवती पोलिसात ३०२ चा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास जिवती पोलीस ठाण्याचे ठाणेदार के.बी. शेळके व त्यांचे सहकारी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

घटनेनंतर
गावात हळहळ
स्वत:चे मालवाहू (पिकअ‍ॅप) वाहन चालवून गुण्यागोविंदाने संसाराचा गाडा चालविणाऱ्या शिवाजी गितेवर चाकू हल्ला करून हत्या केल्याने पालडोह व इतर नातेवाईकांत शोककळा पसरली आहे. त्यांची हत्या का केली असावी, यावर तर्कवितर्क लावले जात आहेत.

पोलिसांनी कठोर होणे गरजेचे
कायद्याच्या चिंधड्या उडवित सर्वसामान्य नागरिकांवर वर्दळीच्या रस्त्यावर हल्लेखोर चाकू हल्ला करून हत्या करण्यासारखे प्रकार घडवितात. हा प्रकार अतिशय गंभीर असून पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.

Web Title: One killed in a knife attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.