हजेरीपटावर एक लाख २२ हजार विद्यार्थी, उपस्थित १३ हजार ९६०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:30 AM2020-12-06T04:30:29+5:302020-12-06T04:30:29+5:30
चंद्रपूर : नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचे सावट टळले नसल्याने ...
चंद्रपूर : नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचे सावट टळले नसल्याने पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. हजेरीपटावर एक लाख २२ हजार ८४ विद्यार्थ्यांची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ १३ हजार ९६० विद्यार्थी शाळेत येत असल्याचे चित्र आहे.
दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरूवात झाली. तसेच कोरोनावर लस येण्यापूर्वीच शासनाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु केल्या. मात्र याला काही पालकांनी तसेच पालकांच्या संघटनेकडून विरोध करण्यात आला. तसेच शाळेतील शिक्षकांसह शाळेतील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ३७९ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे पालकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना चुकून कोरोना झाल्यास पालकांच्या रोषाला सामोर जावे लागण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र घेवून शाळेत यावे, असा निर्णय घेण्यात आला. मात्र शाळेतून संमती घेण्यास पालक अनुत्सुक दिसून आले.
जिल्ह्यात नववी ते बारावीच्या ६१७ शाळा आहेत. त्यापैकी ३७६ शाळा सुरू आहेत. जिल्ह्यातील पटसंख्या एक लाख २२ हजार ८४ विद्यार्थ्यांची नोंद आहे. ५० टक्के तत्वावर विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात येत आहे. यापैकी केवळ १४ हजार विद्यार्थ्यांनी संमतीपत्र दिले. त्यापैकी १३ हजार ९४० विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत असल्याने अद्यापही शाळेला विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लागून आहे.
बॉक्स
स्वॅब टेस्टमुळे शिक्षकांची संख्या कमी
शाळेतील शिक्षकांसह शाळेतील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत सात हजार ८०० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३७९ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे शाळेत शिक्षकांची कमी आहे.
कोट
५० टक्के विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात येत आहे. ज्या शाळेत रुग्ण आढळले आहेत. त्या शाळा सात दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. शुक्रवारी ६१७ शाळांपैकी ३७६ शाळा सुरू होत्या. त्यामध्ये १३,९६० विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येक दिवशी जवळपास एवढेच विद्यार्थी उपस्थित राहत आहेत.
- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी( माध्य.),