एक लाख ७९ हजार ८५७ प्रौढ नागरिकांचे होणार बीसीजी लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 01:56 PM2024-09-07T13:56:49+5:302024-09-07T13:57:56+5:30
Chandrapur : डॉक्टरांनी स्वतः लस घेत केली बीसीजी लसीकरणाची सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रौढ बीसीजी लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी स्वतः डॉक्टरांनी लस घेऊन लसीकरणास सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ७९ हजार ८५७ प्रौढ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती राजगोपाल, डॉ. माधुरी मेश्राम व उज्ज्वला सातपुते आदी उपस्थित होते. बीसीजी लस जन्मतः बाळाला देत असल्यामुळे ती पूर्णतः सुरक्षित व उपयुक्त आहे.
बीसीजी लस लहान मुलांप्रमाणेच प्रौढ व्यक्तींसाठीही उपयुक्त ठरते आहे. जिल्ह्यात अतिजोखमीच्या गटातील लस घेण्यासाठी संमती दिलेल्या टीबी-वीन पोर्टलवर नोंदणी केलेल्या एक लाख ७९ हजार ८५७ प्रौढ व्यक्तींचे लसीकरण करण्यात विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावांत उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्रात स्वतंत्र बीसीजी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे लसीकरण करणे सोयीचे होईल. देश क्षयरोगमुक्त होण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी केले आहे. चंद्रपूर मनपा क्षेत्रातही मनपातर्फे ही लस देण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांनी ही लस घ्यावी, असे आवाहन मनपाचे आयुक्त विपीन पालिवाल यांनी केले आहे.
"राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत वर्ष २०२५ पर्यंत देशाला क्षयरोगमुक्त करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. त्यानुसार जिल्ह्यात १८ वर्षावरील प्रोंढ व्यक्तींना बीसीजी लस देण्यात येईल. या मोहिमेत जिल्ह्यातील एक लाख ७९ हजार ८५७ प्रौढ व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. टीबीचा उपचार घेणारे रुग्ण, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, धूम्रपान करणारे यासोबतच ज्यांचा बॉडी मास इंडेक्स १८ पेक्षा कमी आहे, अशा व्यक्तींनी लस घ्यावी. तर १८ वर्षापेक्षा कमी वयाचे, एचआयव्हीग्रस्त, गरोदर व स्तनदा माता यांनी लस घेऊ नये."
- डॉ. ललित पटले, जिल्हा क्षयरोग अधिकारी, चंद्रपूर