स्टेट बँकेतून एक लाख उडविले
By admin | Published: July 17, 2014 11:59 PM2014-07-17T23:59:23+5:302014-07-17T23:59:23+5:30
अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या कस्तुरबा मार्गावरील स्टेट बँकेच्या मुख्य कार्यालयातील काऊंटरवरून एक लाख रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली. ही घटना गुरूवारी दुपारी
चंद्रपूर : अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या कस्तुरबा मार्गावरील स्टेट बँकेच्या मुख्य कार्यालयातील काऊंटरवरून एक लाख रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली. ही घटना गुरूवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, बँकेच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या सहा भामट्यांचा शहर पोलीस शोध घेत आहेत.
येथील एसटी महामंडळात कार्यरत सहाय्यक वाहतूक निरीक्षक मुख्तार अहमद अब्दूल हफीज शेख, लिपीक लक्ष्मण कुंभार व सुरक्षा रक्षक किसन सहारे हे तिघे जण महामंडळाचे पैसे भरण्यासाठी गुरूवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास कस्तुरबा मार्गावरील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत पोहचले. सर्वप्रथम लक्ष्मण कुंभारे यांनी काऊंटरवर जाऊन सहा लाख ३९ हजारांची रक्कम बँकेत भरली. त्यानंतर मुख्तार अहमद हे एक लाख ६६४ रुपयांची रक्कम भरण्यासाठी काऊंटरवर पोहचले. त्यांनी हातातील रक्कम काऊंटरवर ठेवताच, मागून आलेल्या तिघांनी ‘तुमचे पैसे खाली पडले’ अशी थाप मारली. त्यामुळे मुख्तार अहमद पैसे पाहण्यासाठी खाली वाकताच, त्या तिघा भामट्यांनी काऊंटरवरील एक लाखाची रक्कम लंपास करीत तेथून पळ काढला. या घटनेने बँक प्रशासनही हादरून गेले आहे. बँकेत सुरक्षा रक्षक असताना व ग्राहकांची गर्दी असताना घडलेली ही घटना बँकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लावणारी ठरली आहे.(प्रतिनिधी)