एक लाख नऊ हजार ज्येष्ठांची दुसऱ्या डोससाठी ताटकळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:28 AM2021-05-13T04:28:49+5:302021-05-13T04:28:49+5:30
जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नागरिकांकडून प्रतिसादच मिळत नव्हता. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर ४०० ते ५०० लसी उपलब्ध करून दिल्या ...
जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नागरिकांकडून प्रतिसादच मिळत नव्हता. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर ४०० ते ५०० लसी उपलब्ध करून दिल्या जात होत्या. दरम्यान, कोरोना संसर्ग वाढल्याने नागरिक जागृत झाले. आरोग्य विभागानेही लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी यंत्रणा कामी लावली. याचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या मानसिकेतत दिसून आला. आता शेकडो नागरिक स्वत:हून लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करीत आहेत. लस घेण्यास वाटेल ते दिव्य सहन करताना दिसतात.
आरोग्य यंत्रणा सज्ज; परंतु लससाठा नाही
लसीकरणासाठी प्राधान्य गटानुसार आरोग्य विभागाने तयारी करून ठेवली. परंतु, शासनाकडून जिल्ह्याला लस किती उपलब्ध होतात, यावरच सर्व काही अवलंबून आहे. पुरेशा लसीच मिळत नसल्याने आरोग्य विभागाच्या वाढीव केंद्रांना सध्या तरी अर्थच उरला नाही. या लस तुटवड्यात पहिला डोस घेऊन कालावधी पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची मात्र ताटकळ सुरू आहे.
हेल्थ केअर, फंटलाइन वर्करची उद्दिष्टपूर्ती
जिल्ह्यात १९ हजार ८१४ हेल्थ केअर कर्मचाऱ्यांनी पहिला डोस तर १२ हजार ६६४ जणांनी दुसरा डोस घेतला. आता दुसरा डोस घेणारे सात हजार १५० शिल्लक आहेत. २२ हजार ३१७ फंटलाइन वर्कर पहिला व नऊ हजार १२५ जणांनी दुसरा डोस घेतला. १३ हजार १९२ फंटलाइन वर्कर डोस घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. डोस उपलब्ध झाल्यास दोन्ही प्राधान्य गटाची लवकरच उद्दिष्टपूर्ती होऊ शकते. मात्र, सामान्य नागरिकांना ताटकळत राहावे लागणार आहे.
१८ ते ४४ वयोगटात १७ हजार ९०४ जणांचे लसीकरण
जिल्ह्यात मंगळवारपर्यंत दोन लाख ७४ हजार ९९७ जणांनी लस घेतली. त्यामध्ये १९ ते ४४ वयोगटातील १७ हजार ९०४ जणांचा समावेश आहे. यातही दहा हजार ८७ कोविशिल्ड, तर सात हजार ८१७ जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली.