विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक : भद्रावतीचे वाकाटककालीन ‘वरदविनायक मंदिर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2022 10:53 AM2022-09-02T10:53:51+5:302022-09-02T10:56:04+5:30

या मंदिरात चतुर्थीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते.

One of the Ashtavinayakas of Vidarbha : 'Varadavinayaka Temple of Bhadravati' | विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक : भद्रावतीचे वाकाटककालीन ‘वरदविनायक मंदिर’

विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक : भद्रावतीचे वाकाटककालीन ‘वरदविनायक मंदिर’

googlenewsNext

सचिन सरपटवार

भद्रावती (चंद्रपूर) : येथील वरदविनायकाचे मंदिर विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक मानले जाते. निसर्गरम्य अशा आसना (गवराळा) तलावाजवळ गवराळा गावाच्या हद्दीत टेकडीवर हे मंदिर आहे. उत्तराभिमुख असलेल्या या मंदिरात सहा फूट उंचीची वरदविनायकाची मूर्ती आहे. हे वाकाटककालीन मंदिर आहे.

मूर्तीचे पोट पोकळ असून कोणीतरी धनाभिलाशीने ते फोडले होते, असा पुरातन लेखांमध्ये उल्लेख आढळून येतो. या मंदिराच्या स्थापनेमागील आख्यायिका अशी आहे की, गृहस्मद नावाच्या ऋषीचा जन्म मुकुंद नामक ऋषीकन्या व इंद्र यांच्या संबंधातून झाला होता. एकेदिवशी मगध राजाच्या घरी श्राद्धासाठी अनेक ऋषी जमले होते. त्यात गृहस्मदही होते. कार्यक्रमादरम्यान गृहस्मद हा औरस पुत्र नसून जारज आहे, असे म्हणून अत्रीने गृहस्मद ऋषीचा अपमान केला. गृहस्मद संतापले. त्यांनी घरी येऊन आईला खरी माहिती विचारली. आईचे ऐकून तो दुःखी झाला. पुष्पक वनात गेला. तेथे गणेशाची आराधना केली. गणेश प्रसन्न झाले, वर दिला. वर प्राप्तीनंतर त्याने वरदविनायकाची स्थापना केली. हेच वरदविनायक मंदिर म्हणजे गवराळा येथील मंदिर असल्याची आख्यायिका आहे.

या मंदिरात चतुर्थीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. निसर्गाचे वरदान लाभलेल्या परिसराला पर्यटन क्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भद्रावती नगरपालिकेद्वारे या परिसरात अनेक सुविधा पर्यटकांसाठी केल्या आहेत. याच देवळाच्या बाजूस यौनाश्वाचे देऊळ अथवा महाल आहे. हे देऊळ मात्र पश्चिममुखी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील चिंतामणी गणेशानंतर गवराळा येथील वरदविनायकाची कथा सुरू होते. या मंदिरात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

नगरपालिकेतर्फे सौंदर्यीकरण

वरदविनायक मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येत असून बाजूलाच असलेला गवराळा तलाव (आसना) नगरपरिषद भद्रावतीद्वारे लवकरच खरेदी करण्यात येणार असून त्याचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवला असल्याचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी सांगितले.

गणेश मंदिराचा रस्ता सुशोभित करण्यात आला आहे. मंदिर परिसरात हायमॅक्स लावलेला आहे. भक्तांसाठी राहण्याच्या दृष्टीने ५२ बेडची धर्मशाळा तसेच स्वयंपाकगृह करण्यात आले आहे. रस्त्याला लागूनच पेव्हर ब्लॉक, बेंचेस लावण्यात आले असून बगिचा तयार करण्यात आलेला आहे. काँक्रीट रस्ता आणि संरक्षण भिंतसुद्धा बांधण्यात आलेली आहे. भाविकांच्या दृष्टीने उत्तम सोयी नगरपरिषदद्वारे या परिसरात करण्यात आल्या आहेत.

Web Title: One of the Ashtavinayakas of Vidarbha : 'Varadavinayaka Temple of Bhadravati'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.