गाव पहाल एका गल्लीचे, कारभार म्हणाल तर दोन ग्रामपंचायतींचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 03:57 PM2020-07-09T15:57:54+5:302020-07-09T16:02:40+5:30

चिमूर तालुक्यातील खुर्सापार सुमारे दोनशे ते अडीचसे लोकवस्तीचे एकाच गल्लीचे गाव आहे. वाहानगाव व बोथली या दोन ग्रामपंचायतींमधून खुर्सापार गावचा कारभार चालतो. गावच्या विकासात ही बाब फायद्याची कमी आणि अडचणीची अधिक ठरते आहे.

one villege and two gram panchayats ...in Chandrapur district | गाव पहाल एका गल्लीचे, कारभार म्हणाल तर दोन ग्रामपंचायतींचा...

गाव पहाल एका गल्लीचे, कारभार म्हणाल तर दोन ग्रामपंचायतींचा...

Next
ठळक मुद्दे विकास मात्र खुंटलाखुसार्पार गावाची अजब कहाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दोन किंवा त्यापेक्षा अधिक गावे, वाड्या-वस्त्यांंची मिळून गटग्रामपंचायत असते. त्यामार्फत कारभार चालतो, अशी अनेक उदाहरणे आहेत. पण केवळ एकच गल्ली असलेल्या गावचा कारभार चक्क दोन ग्रामपंचायतींमधून चालतो, हे मात्र दूर्मिळच. चिमूर तालुक्यातील खुर्सापार सुमारे दोनशे ते अडीचसे लोकवस्तीचे एकाच गल्लीचे गाव आहे. वाहानगाव व बोथली या दोन ग्रामपंचायतींमधून खुर्सापार गावचा कारभार चालतो. गावच्या विकासात ही बाब फायद्याची कमी आणि अडचणीची अधिक ठरते आहे. त्यामुळे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, अशीच काही अवस्था खुर्सापारची झाली आहे.
चिमूर-वरोरा मार्गावरील वाहानगाव आणि बोथली ही दोन गावे असून या दोन्ही महसूल गावांच्या दोन किमी आतमध्ये खुर्सापार गाव आहे. गाव एकाच गल्लीचे आहे. गल्लीच्या एका बाजूची घरे वाहानगावच्या हद्दीत, तर दुसऱ्या बाजूची घरे बोथलीच्या हद्दीत. दोन्ही गावांची मिळून जुळलेले गाव म्हणजे खुर्सापार असा येथील इतिहास आहे.
गावाची लोकसंख्या दोनशेच्या जवळपास असून शंभरावर मतदार आहेत. वाहानगाव व बोथलीपासून जाण्या-येण्यासाठी पक्का रस्ता आहे; मात्र पाणी, दिवाबत्ती, गटारी अशा सुविधांची वानवा आहे. दोन ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या गावाचे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ मात्र एकच आहे. ग्रामपंचायत दोन असल्यामुळे दोन्ही बाजूंनी निधी आणून विकासकामे राबवणे सोपे आहे, असेच सर्वांना वाटले; पण प्रत्यक्षात सीमा वाद आडवा येतो. शिवाय येथे मतदारसंख्याही जुजबीच आहे. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायती आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशीच विकासाची अवस्था आहे.

एकाच गावात शाळेच्या दोन इमारती
वाहानगाव व बोथली अशा दोन ग्रामपंचायतींमध्ये समावेश असलेल्या खुर्सापार गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चवथीपर्यंत शाळा आहे. शाळेसाठी बोथली ग्रामपंचायत व वाहानगाव ग्रामपंचायतच्या मार्फतीने दोन इमारती बांधल्या आहेत. त्यामध्ये बोथली ग्रामपंचायतने बांधलेली शाळा जीर्ण झाली. त्यामुळे आता वाहानगाव ग्रामपंचायतने बांधलेल्या इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

इतर सुविधांसाठी पायपीट
शिक्षणासाठी काही विद्यार्थी परगावी गेले आहेत. गावात प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था आहे. पुढील शिक्षणासाठी मात्र विद्यार्थांना सुमारे पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते. दळणवळणाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांची कामानिमित्त दररोज पायपीट ठरलेलीच. गावात प्राथमिक सुविधाही नाहीत.
कोट
तीन घरापासून आता ४० घरे झाली आहेत. गावाची लोकसंख्या दोनशेच्या जवळपास. मात्र गावाचा कारभार दोन ग्रामपंचायतींमधून चालतो. त्यामुळे विकास कामे, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे गावाचा समावेश दोनपैकी कोणत्याही एकाच ग्रामपंचायतमध्ये करावा.
-बंडू बुचे
ग्रामस्थ, खुर्सापार

Web Title: one villege and two gram panchayats ...in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार