एसटीचे ऑनलाइन बुकिंग अनेकांना ठाऊकच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:32 AM2021-08-25T04:32:56+5:302021-08-25T04:32:56+5:30
चंद्रपूर : प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दहा वर्षांपूर्वी बुकिंगची सोय केली आहे. मात्र अनेकांना यासंदर्भात माहितीच ...
चंद्रपूर : प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दहा वर्षांपूर्वी बुकिंगची सोय केली आहे. मात्र अनेकांना यासंदर्भात माहितीच नाही तर काहींना माहीत असूनही बुकिंग करण्याच्या भानगडीतच पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महामंडळाला यासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे. सध्या प्रत्येकाच्या हातात ॲण्ड्रॉइड मोबाइल आला आहे. त्यातच ऑनलाइन व्यवहाराला सर्वत्र प्राधान्य दिले जात आहे. एसटी महामंडळानेही ऑनलाइन तिकिटाची व्यवस्था केली आहे. यासाठी मोबाइल ॲपचा वापर करावा लागतो. मोबाइलवरून सीट बुकिंगसाठी ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. मात्र अनेक जण या सुविधेसाठी उदासीन असल्याने याकडे पाठ फिरविली आहे.
पूर्वी प्रवाशांना लांबच्या पल्ल्यासाठी एसटीत जागा मिळत नव्हती. त्यामुळे बुकिंगला अधिक प्राधान्य दिले जायचे. सध्या खासगी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे अनेक जण याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
बाॅक्स
असे करावे ऑनलाइन बुकिंग
महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी एका क्लिकवर तिकिटांचे आरक्षण करता यावे, यासाठी एमएसआरटीसी मोबाइल रिझर्व्हेशन ॲपची निर्मिती केली. या ॲपद्वारे प्रवाशांना हव्या त्या गाडीच्या तिकिटाचे आरक्षण करून पैसे ऑनलाइन भरता येते.
महामंडळाच्या ऑनलाइन बुकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना गुगलवर जावे लागते.
बाॅक्स
वेळ अन् पैशाची बचत
एसटी महामंडळाच्या वतीने दहा वर्षांपूर्वी ऑनलाइन बुकिंगची प्रणाली विकसित करण्यात आली. आता त्यापुढे जात मोबाइल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.
बुकिंगसाठी बसस्थानकातील सेंटरवर रांगेत थांबावे लागते. त्याउलट मोबाइल ॲप हा प्रवाशांसाठी सोयीचा आहे. या ऑनलाइन प्रणालीतून प्रवाशांचा वेळ, पैशाची बचत होत आहे. ग्रामीण भागात ऑनलाइन प्रणालीबाबत माहितीच नसल्याचे चित्र आहे.
बाॅक्स
कोरोनामुळे अल्प प्रतिसाद
चंद्रपूर विभागामध्ये ऑनलाइन तिकीट बुकिंगला अल्प प्रतिसाद आहे. त्यातच कोरोना संकटामुळे प्रवासी या सुविधेकडे दुर्लक्ष करीत आहेत. विशेषतः चंद्रपूर परिसर हा ग्रामीण भागासोबत निगडित आहे. त्यामुळे बहुतांश प्रवासी ऑनलाइन तिकीट बुकिंग करण्याच्या भानगडीत पडत नाहीत.
बाॅक्स
रेल्वे प्रवास करताना ऑनलाइन तिकीट मिळत असल्याची माहिती आहे. मात्र एसटीचे बुकिंगही ऑनलाइन होते, हे माहीतच नव्हते. तसेही आपण ग्रामीण भागात राहत असल्यामुळे एसटीचे बुकिंग करण्याची मुळीच गरज नाही.
गजानन रायपुरे
कोट
एसटीच्या ऑनलाइन सेवेचा शहरातील नागरिक लाभ घेतात. ग्रामीण भागात या सेवेचा अद्याप कुणीच लाभ घेत नाही. प्रवाशांना ही सुविधा अडचणीची वाटते. त्यापेक्षा तिकीट काढून थेट प्रवास करणे सोयीचे आहे.
प्रशांत बुक्केवार