कस्टमर केअरच्या नावावर ऑनलाइन फसवणूक; २ लाख ३७ हजारांचा लावला चूना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 01:05 PM2022-11-04T13:05:10+5:302022-11-04T13:08:10+5:30
फसवणूक झाल्याचे कळताच, त्यांनी याची माहिती बल्लारपूर पोलीस ठाण्यात दिली.
बल्लारपूर (चंद्रपूर) : कस्टमर केअरचे खोटे नाव सांगून स्टेट बँकेच्या खात्यातून अज्ञात आरोपीने २ लाख ३७ हजार ३८८ रुपयांची लुबाडणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रशांत रामानंद वैद्य (५१) रा. गोरक्षण वार्ड असे फसवणूक झालेल्या खातेदाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत रामानंद वैद्य हा बल्लारशाह रेल्वे येथे कर्मी दल विभागात कामाला आहे. त्यांनी दहा दिवसांअगोदर स्मार्ट फोन खरेदी केला. त्यांने मोबाइलवर फोन पे कसा डाउनलोड करायचा, यासाठी कस्टमर केअरमध्ये फोन केला. तेव्हा अज्ञात व्यक्तीने फोन उचलून त्याला व्हॉट्सॲपवर एक लिंक डाउनलोड करायला लावली. एनीडेस्क ॲपसुद्धा डाउनलोड करायला लावला. तो जसे सांगत गेला तसे प्रशांत करीत गेला.
थोड्याच वेळात प्रशांतला स्टेट बँकेतून फोन आला की, तुमच्या खात्यातून २ लाख ३७ हजार ३८८ रुपयाचे ट्रांजेक्शन झाले आहे. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे प्रशांत वैद्य यांच्या लक्षात आले. या घटनेची तक्रार प्रशांत वैद्य यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अलीकडे ऑनलाइन फसवणुकीच्या घटना रोज घडत आहेत. पोलीस व बँकेचे अधिकारी वारंवार नागरिकांना सावधान करीत आहे. प्रत्येकांनी ऑनलाइन व्यवहारापासून सावध राहिले पाहिजे.
- उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बल्लारपूर