मध्यरात्रीपर्यंत चालली उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ऑनलाईन प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:33 AM2021-01-08T05:33:13+5:302021-01-08T05:33:13+5:30
सावली ७२, भद्रावती ५८, पोंभुर्णा २५ तर बल्लारपूरमध्ये १३ जणांनी घेतले अर्ज मागे चंद्रपूर : जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक ...
सावली ७२, भद्रावती ५८, पोंभुर्णा २५ तर बल्लारपूरमध्ये १३ जणांनी घेतले अर्ज मागे
चंद्रपूर : जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तसेच उमेदवारांना चिन्ह वाटपाची ४ जानेवारी ही शेवटची तारीख होती. रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय ऑनलाईन प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे तालुकानिहाय किती उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, ही माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, पोंभुर्णा तालुक्यात २५, बल्लारपूर १३, सावली ७२, भद्रावती तालुक्यातील ५८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर जिवती तालुक्यात एका ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार असून, यासाठी ७ पुरुष तसेच ११ महिला उमेदवार रिंगणात आहेत.
१५ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावागावात राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बहुतांश गावामध्ये चढाओढ बघायला मिळाली आहे. अनेकांचे रुसवे-फुगवेही चव्हाट्यावर आले. दरम्यान, सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तसेच चिन्ह वाटपाची प्रक्रिया पार पडली. मात्र ऑनलाईन प्रक्रिया पार पाडताना प्रशासकीय यंत्रणेला चांगलाच घाम फुटला. त्यामुळे रात्री ९ वाजेपर्यंतही काही तालुक्यातील उमेदवारांची अंतिम माहिती मिळू शकली नाही. तर भद्रावती तालुक्यात ५८ जणांनी आपले अर्ज मागे घेतले असून, आता ९९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सावली तालुक्यामध्ये ७२ जणांनी माघार घेतली असून, आता ८४९ उमेदवार, पोंभुर्णामध्ये २५ जणांनी अर्ज मागे घेतले असून ३९३, तर बल्लारपूर तालुक्यात १३ जणांनी अर्ज मागे घेतले असून, २६६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, जिवती तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी १८ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये ११ महिला तर ७ पुरुषांचा समावेश आहे.
बाॅक्स
जिल्ह्यात निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती
६२९
---
एकूण प्रभागाची संख्या १९८१
--
बाॅत्स
सर्वाधिक उमेदवार असलेल्या ग्रामपंचायती
जिल्ह्यात भद्रावती तालुक्यातील माजरी, बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, चिमूर तालुक्यातील नेरी या १७ सदस्यीय तसेच शंकरपूर ग्रामपंचायत १५ सदस्यीय आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या ग्रामपंचायतीवर जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत.
बाॅक्स
या ग्रामपंचायतीकडे सर्वांचेच लक्ष
चिमूर तालुक्यातील शंकरपूर या ग्रामपंचायतीकडे सध्या तरी सर्वांचेच लक्ष लागले आहे. हे गाव काँग्रेसचे जि.प. गटनेते डाॅ. सतीश वारजूकर यांचे मूळ गाव आहे. दरम्यान, विसापूर, नेरी, माजरी या ग्रामपंचायतीकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.
---