दहावीतही मुलींचीच बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:25 AM2018-06-09T00:25:41+5:302018-06-09T00:25:41+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८५.१५ टक्के लागला. नागपूर विभागात निकालात चंद्रपूर जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८५.१५ टक्के लागला. नागपूर विभागात निकालात चंद्रपूर जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे. मागील तीन वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही दहावीत मुलींनीच बाजी मारली. त्या मुलांच्या तुलनेत अव्वल राहिल्या.
चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ४६४ शाळांमधून ३१ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील ३१ हजार ८०८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. पैकी एकूण २७ हजार ८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्बल तीन हजार ८९० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. १० हजार ५४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १० हजार ६३६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर दोन हजार ५०९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा निकालात सहाव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी जिल्हा निकालात पाचव्या क्रमांकावर होता. त्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात जिल्ह्याची टक्केवारी चांगलीच घसरली आहे.
मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी दहावीच्या परीक्षेत आपल्या हुशारीची चुणूक दाखविली. दहावीच्या परीक्षेत एकूण १६ हजार ८०० मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १६ हजार ६८२ मुले परीक्षेला बसली. यातील १३ हजार ७५६ मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८२.४६ आहे.
यासोबतच एकूण १५ हजार १७८ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १५ हजार १२६ मुलींनी परीक्षा दिली. पैकी १३ हजार ३२८ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८८.११ आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली.
पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ५१.२७ टक्के
दहावीच्या परीक्षेत पुनर्परीक्षार्थ्यांचा (रिपीटर) निकाल ५१.२७ टक्के लागला आहे. एकूण दोन हजार ६१ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता नोंदणी केली. यातील दोन हजार ४४ विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी एक हजार ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ५१.२७ आहे. पुरर्परीक्षार्थ्यांमध्ये चार विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. ५५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे तर ९३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
५० शाळांचा निकाल शंभर टक्के
यंदा जिल्ह्याच्या निकालाची टक्क़ेवारी घसरली असली तरी शाळांचा निकाल मात्र चांगला लागला आहे. जिल्ह्यातील तब्बल ५० शाळांनी शंभर टक्के निकाल दिला आहे.