धरणांमध्ये फक्त २०.७१ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:29 AM2021-05-21T04:29:04+5:302021-05-21T04:29:04+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यातील एक मोठा व आठ मध्यम धरणांची बांधबंदिस्ती उत्तम असताना बुधवार (दि. १९)पर्यंत केवळ २०.७१ टक्के ...

Only 20.71 per cent water storage in dams | धरणांमध्ये फक्त २०.७१ टक्के जलसाठा

धरणांमध्ये फक्त २०.७१ टक्के जलसाठा

Next

चंद्रपूर : जिल्ह्यातील एक मोठा व आठ मध्यम धरणांची बांधबंदिस्ती उत्तम असताना बुधवार (दि. १९)पर्यंत केवळ २०.७१ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच दिवसापर्यंत धरणांमध्ये ३६.३ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदा मान्सून लांबल्यास यंदाच्या खरीप हंगामावर अनिष्ट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चंद्रपूर पाटबंधारे विभागअंतर्गत येणाऱ्या मोठ्या, मध्यम, लघू व मामा तलावांच्या बांधबंदिस्ती व दुरुस्तीची कामे गतवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करण्यात आली होती. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कार्यकारी अभियंता काळे यांनी या कामांकडे प्राधान्याने लक्ष दिले. परिणामी, आसोलामेंढा हा मोठा प्रकल्प व मध्यम प्रकल्पात येणाऱ्या घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव तसेच १६ लघुप्रकल्पांतील कामेही विहित कालावधीतच पूर्ण होऊ शकली. पावसाळा सुरू झाल्यानंतर या धरणांमध्ये जलसाठा उपलब्ध होऊ शकला. शिवाय, संभाव्य गळतीलाही आळा बसला. मात्र, गतवर्षी जिल्ह्यात पुरेसा पाऊसच पडला नाही. त्यामुळे मागील वर्षातील मृत साठा, एकूण साठा आणि उपयुक्त उपलब्ध जलसाठ्याची आजच्या स्थितीशी तुलना केल्यास बरीच तफावत दिसून येते. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही बाब चिंता निर्माण करणारीच आहे.

आसोलमेंढा प्रकल्प दिलासादायी

आसोलामेंढा प्रकल्पाचा संकल्पीय साठा ५२.३३० द.ल.घ.मी. आहे. सद्य:स्थितीत ३७.२२० द.ल.घ.मी. (७१. १३ टक्के) उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच कालावधीत या धरणात ८२.१ टक्के जलसाठा उपलब्ध होता. मध्यम प्रकल्पाच्या तुलनेत या मोठ्या धरणाची स्थिती दिलासा देणारी आहे.

चंद्रपूर पाटबंधारे विभाग अलर्ट

पावसाळ्यात धरणांची स्थिती सक्षम राहावी, यासाठी दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली. बरीच कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. सिंचन प्रकल्प क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये पाणीवापर संस्थांनाही सक्रिय करण्यात आल्या. खरीप हंगामात धरणातील पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी चंद्रपूर पाटबंधारे विभाग सतर्क झाला आहे.

जिल्ह्यातील धरणांची स्थिती (१९ मे २०२१ पर्यंत)

धरण- उपलब्ध साठा द.ल.घ.मी.

आसोलमेंढा- ३७.२२०

घोडाझरी- ४.८७७

नलेश्वर- १०.९३०

चंदई - ०००

अमलनाला- ८.५०९

लभानसराड- ०००

पकडीगुड्डम- १३.३०७

डोंगरगाव- १४.१७८.

एकूण- २०.६२९ (२०.७१ टक्के)

Web Title: Only 20.71 per cent water storage in dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.