जि.प.शाळेच्या २५ टक्केच पालकांकडे अॅन्ड्राईड मोबाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:00 AM2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:58+5:30
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडील इलेक्ट्रानिक सुविधांसदर्भात माहिती गोळा केली आहे. या माहितीमध्ये केवळ २५ ते ३० टक्केच पालकांकडे अॅन्ड्राईड मोबाईल असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात स्टडी फार्म होम योजना कितपत यशस्वी होते, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे
साईनाथ कुचनकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांची शिक्षणाची ओढ कमी होऊ नये, विद्यार्थी अभ्यासात गुंतून रहावे तसेच भविष्याची तयारी म्हणून शिक्षण विभागाने ‘स्टडी फार्म होम’ची तयारी सुरु केली आहे. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडील इलेक्ट्रानिक सुविधांसदर्भात माहिती गोळा केली आहे. या माहितीमध्ये केवळ २५ ते ३० टक्केच पालकांकडे अॅन्ड्राईड मोबाईल असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात स्टडी फार्म होम योजना कितपत यशस्वी होते, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे
यावर्षी पहिल्यांदाच परीक्षा न होताच मार्च महिन्यामध्येच विद्यार्थ्यांना सुट्या लागल्या. त्यातच पुढील सत्र केव्हा सुरू होणार यासंदर्भात अजूनपर्यंत तरी कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी शिक्षण विभागाने पाऊल उचलने सुरु केले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडील इलेक्ट्रानिक साधनांची माहिती गोळा करण्यात आली आहे. या माहितीमध्ये ग्रामीण भागातील २५ ते ३० टक्के पालकांकडे अॅन्ड्राईड मोबाईल सुविधा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, ३५ ते ४० टक्के पालकांकडे साधा मोबाईल असल्याचेही शिक्षकांच्या निदर्शनास आले असून काही जणांकडे मोबाईलच नाही तर काहींनी आर्थिक संकटामुळे बंद असलेला मोबाईल दुरुस्त सुद्धा केला नसल्याचे निदर्शनात आले आहे. काही इंग्रजी शाळांना स्टडी फॉर्म होम अभ्यासक्रमाला सुरूवात केली आहे. या उपक्रमाला इंग्रजी शाळांतील पालकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता त्यांना अॅन्ड्राईड मोबाईल परवडण्यासारखा नसल्याने जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठीचा हा प्रयोग भविष्यात यशस्वी होतो की, फक्त कागदी घोडेच नाचविले जाते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
ग्रामीण पालकांची मनस्थितीच नाही
कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वच व्यवहार ठप्प पडले आहे. अनेकांना जगण्या-मरण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाºया काही विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती कमजोर आहे. त्यामुळे त्यांच्याकडे साधा मोबाईल सुद्धा नाही. त्यामुळे मोबाईलद्वारे शिक्षण देण्याचा प्रयोग ग्रामीण भागात तरी यशस्वी होणार की, नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रम, राज्यस्तरावरील येणारे प्रोग्राम तसेच मनोरंजनात्मक माहिती मिळावी यासाठी पालकांच्या मोबाईलसंदर्भात माहिती गोळा करण्यात आली. यामध्ये २५ ते ३० टक्केच पालकांकडे अॅन्ड्राईड मोबाईल असल्याचे समोर आले आहे.
-दीपेंद्र लोखंडे
शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि.प.चंद्रपूर