फक्त २५ हजार डोस मिळाले बहुतांश केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:29 AM2021-04-27T04:29:28+5:302021-04-27T04:29:28+5:30
चंद्रपूर : मागील चार दिवसांपासून लस घेण्यासाठी केंद्रात येणाऱ्या नागरिकांना लस न घेताच परत जावे लागत आहे. ...
चंद्रपूर : मागील चार दिवसांपासून लस घेण्यासाठी केंद्रात येणाऱ्या नागरिकांना लस न घेताच परत जावे लागत आहे. मात्र, नागरिकांना आता मंगळवारी लस मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी रात्री उशिरा २५ हजार डोस जिल्ह्याला प्राप्त होणार आहेत. त्यामुळे बहुतांश केंद्रांवर अल्प प्रमाणात का होईना, लसीचे वितरण करण्याची तयारी जिल्हा आरोग्य प्रशासनाने केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने ६० वर्षे, ४५ वर्षांवरील सहव्याधी आणि ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी १ एप्रिलपासून जिल्ह्यात सुमारे २०० केंद्र सुरू करण्यात आली. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका केंद्राचा अपवाद वगळल्यास सर्वच केंद्रांमधून कोविशिल्ड लस दिली जात आहे. हेल्थ केअर, फ्रन्टलाईन वर्करचे लसीकरण आता अंतिम टप्प्यात आहे. ६० वर्षांवरील व सहव्याधींसह आता ४५ वर्षांवरील नागरिक दुसरा बुस्टर घेण्यासाठी लसीकरण केंद्रात सकाळी आठ वाजल्यापासूनच रांगा लावत आहेत. मात्र, लस नसल्याने तीन दिवसांपासून आरोग्य प्रशासनाने केंद्र बंद ठेवली आहेत. राज्य शासनाकडे एक लाखाहून जास्त डोस मागविण्यात आले होते. मात्र, २५ हजार डोस मंजूर झाले. सोमवारी रात्री उशिरा हे डोस नागपुरातून चंद्रपुरात आणण्यात येणार आहेत. राज्यांना लस उपलब्ध करून देण्यासोबतच केंद्रांची संख्या, अंतर, वयोगट आदींपासूनचे सर्वच अधिकार केंद्र सरकारने स्वत:कडे ठेवले आहेत. त्यामुळे राज्यांना पर्यायाने जिल्ह्यांनाही वेळोवेळी लसीसाठी वाट पाहावी लागणार आहे.
वाढीव केंद्रांवर लागले ‘नो व्हॅक्सिन’ फलक
नागरिकांना लस घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्ह्यात व चंद्रपूर मनपा क्षेत्रात वाढीव केंद्र सज्ज ठेवण्यात आले. मात्र, मागणीनुसार लस मिळत नसल्याने दर आठवड्यात या केंद्राच्या प्रवेशद्वारावर लस नसल्याचा फलक लावावा लागत आहे. त्यामुळे लस मिळत नसेल तर वाढीव केंद्राचा उपयोग काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.