धरणात केवळ ४३ टक्के पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:42 PM2017-10-01T23:42:47+5:302017-10-01T23:43:15+5:30
यावर्षीचा पूर्ण पावसाळा संपत आला असला तरी जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यावर्षीचा पूर्ण पावसाळा संपत आला असला तरी जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे चंद्रपूरकरांची तहाण भागविणाºया इरई धरणासह जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला असून सध्यास्थितीत जिल्ह्यातील सर्व धरणात केवळ ४३.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरासह इतरही शहरांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून यावर्षीचा उन्हाळा कठीण जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर्षीच्या पावसाळ्याला सुरूवात झाली तेव्हाच वरूणराजाने जिल्हावासीयांना हुलकावणी दिली. पाऊस उशिरा पडल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. जवळपास एक महिना उशिरा पाऊस पडल्याने अनेक शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली होती. अशातच पाऊस पडला, मात्र सरासरीही गाठली नाही. त्यामुळे पावसाळा संपूनही जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडेच आहेत.
अद्यापही शेतकºयांना पावसाची प्रतीक्षाच असल्याने विविध पाणी स्त्रोतांद्वारे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू आहे. धरणात उपलब्ध पाणीसाठ्यातूनही शेतपिकांना पाणी देणे सुरू असल्याने काही दिवसांतच उपलब्ध पाणीसाठा संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीच्या उन्ह्याळ्यात तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
९ सिंचन प्रकल्पात ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा
जिल्ह्यात इरई, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुडम, डोंगरगाव, लाल नाला, आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर अशी ११ सिंचन प्रकल्प आहेत. यापैकी घोडाझरी तलाव वगळता एकाही सिंचन प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध नाही. घोडाझरी तलावात सध्यास्थितीत ७५.७७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून चंदई धरणात ६१.९९ आणि डोंगरगाव धरणात ५९.३० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर इतर धरणात ५० टक्केपेक्षाही कमी पाणीसाठा उपलब्ध आहे.
धरणात सध्या उपलब्ध पाणीसाठी
धरण टक्केवारी
चंदई ६१.९९
चारगाव ३९.९७
अमलनाला २४.८८
लभानसराड १६.१३
पकडीगुडम १८.९९
डोंगरगाव ५९.३०
इरई ३४.५०
लालनाला ३१.०१
आसोलामेंढा ३४.०१
घोडाझरी ७५.२७
नलेश्वर ४६.२७
एकूण ४३.८५