जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचे केवळ ५३६० डोस शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:20 AM2021-07-01T04:20:43+5:302021-07-01T04:20:43+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ८९ हजार ४०० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये चार लाख ६३६ जणांनी प्रथम डोस ...
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ८९ हजार ४०० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये चार लाख ६३६ जणांनी प्रथम डोस तर ८८ हजार ८०४ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. मागील काही दिवसांपासून १८ वर्षांवरील लसीकरण सुरू झाले आहे. मात्र त्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध नसल्याने केंद्रावर जाऊन परत यावे लागत आहे. विशेष म्हणजे लससाठा केव्हा येईल, याबाबत तेथील कर्मचारीसुद्धा माहिती देत नसल्याने दररोज केंद्रावर जावे लागत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ कोव्हॅक्सिनचे ५३६० डोस उपलब्ध आहेत, तर कोविशिल्ड लस कोणत्याच केंद्रावर उपलब्ध नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
बॉक्स
दुसरा डोस घेण्यास विलंब
कोविशिल्डचा दुसरा डोस ८४ दिवसांनंतर घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. अनेकांचा ८४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असल्याने केंद्रावर लस घेण्यासाठी जातात. मात्र लस उपलब्ध नसल्याने त्यांना गेल्या पावली परत जावे लागत आहे. त्यामुळे लसींचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.