डीटीएड्च्या १८७५ जागांसाठी केवळ ५४ अर्ज
By admin | Published: July 1, 2017 12:33 AM2017-07-01T00:33:45+5:302017-07-01T00:33:45+5:30
मागील सात वर्षांपासून सीईटी परीक्षा झाली नाही. त्यामुळे लाखो डीटीएड् पदविकाधारक बेकार आहेत.
विद्यार्थ्यांची पाठ : महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर
परिमल डोहणे । लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील सात वर्षांपासून सीईटी परीक्षा झाली नाही. त्यामुळे लाखो डीटीएड् पदविकाधारक बेकार आहेत. परिणामी अनेक विद्यार्थ्यांनी डीटीएड् पदविका शिक्षणाकडे पाठ फिरवली. या पार्श्वभूमीवर ३१ मेपासून डीटीएड्ची आॅनलाईन प्रवेश प्रकिया सुरु झाली. मात्र प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिवशी फक्त ५४ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. त्यापैकी फक्त २५ विद्यार्थ्यांनी अर्जाची पडताळणी केली. जिल्ह्यात एकूण एक हजार ८७५ जागा आहेत. मात्र ५४ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर केल्यामुळे अनेक जागा रिक्त राहणार असून डीटीएड् महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी महाविद्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात एक शासकीय महाविद्यालय, एक शासन अनुदानित महाविद्यालय, दोन अल्पसंख्याक महाविद्यालय व २५ शासन मान्यता प्राप्त महाविद्यालय असे एकूण २९ डीटीएड् महाविद्यालये आहेत. त्यांची प्रवेश क्षमता एक हजार ८७५ आहे. यासाठी ३१ मेपासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. त्यात जिल्ह्यातील ५४ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यापैकी २५ विद्यार्थ्यांनी अर्जाची पडताळणी केली. त्यामुळे जिल्ह्यातील डीटीएड् महाविद्यालयातील अनेक जागा रिक्त राहणार आहेत.
पूर्वी डीटीएड्च्या प्रवेशासाठी रांगा लागत होत्या. मात्र शासनाने अनेक खाजगी डीटीएड् महाविद्यालयाला मान्यता दिली. त्यामुळे गलोगल्ली डीटीएड् महाविद्यालय उघडण्यात आले. परिणामी अनेक डीटीएड् बेरोजगार पदवीधारकांची फौज निर्माण झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी अनेक महाविद्यालयातील जागा रिक्त राहणार आहेत.
मुदतवाढ देऊनही अल्प प्रतिसाद
डीटीएड्साठी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ मेपासून सुरुवात झाली. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जून व अर्ज पडताळणीची शेवटची तारीख २० जून होती. मात्र अंत्यत कमी अर्ज दाखल झाल्यामुळे प्रवेश अर्ज सादर करण्याची तारीख वाढवून ३० जून करण्यात आली. तर अर्ज पडताळणीची तारीख १ जुलैपर्यंत वाढवण्यात आली. मात्र तरीही विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले नाही.
खाजगी महाविद्यालयांवर संक्रात
जिल्ह्यात २७ खाजगी महाविद्यालये आहेत. त्यांची प्रवेश फी १२ हजार तर शासकीय महाविद्यालयाची प्रवेश फी तीन हजार २०० रुपये आहे. पूर्वी डीटीएड्ला लाखो रुपये डोनेशन देऊन प्रवेश निश्चीत केला जायचा मात्र आता विद्यार्थ्यांनी डीटीएड्कडे पाठ फिरवल्याने अनेक खाजगी महाविद्यालयावर संक्रात येणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.
कर्मचारी होणार बेरोजगार
डीटीएड्चे आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशीसुद्धा प्रवेशासाठी विद्यार्थ्यानी अल्पसा प्रतिसाद दिल्यामुळे फक्त ५४ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी २५ विद्यार्थ्यांनी शासकीय डीटीएड् विद्यालयात अर्जांची पडताळणी केली. त्यामुळे अनेक महाविद्यालयातील जागा रिक्त राहणार आहेत. परिणामी महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
सात वर्षांपासून सीईटी परीक्षा नाही
पूर्वी हमखास नोकरी मिळण्याचे शिक्षण म्हणून डीटीएड्कडे बघितले जायचे. मात्र मागील सात वर्षांपासून एकदाही सीईटी परीक्षा झाली नाही. तसेच २०१० ला केंद्रीय शिक्षक भरती झाली. त्यानंतर आजपर्यंत एकदाही शिक्षक भरती झालेली नाही.