केवळ 88 मिमी पाऊस, जिल्ह्यात ४ लाख २५ हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या
By राजेश मडावी | Published: July 6, 2023 05:30 PM2023-07-06T17:30:08+5:302023-07-06T17:33:17+5:30
अपुऱ्या पावसाने ६५ हजार हेक्टरमध्येच पेरण्या
चंद्रपूर : खरीप हंगामाची तयारी करून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना जुलैच्या पहिल्याच आठवड्यात अपेक्षाभंगाला सामाेरे जावे लागले. केवळ ८८ मी. मी. पाऊस झाल्याने ६५ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली तर तब्बल ४ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. दमदार पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात एकूण ५० महसूल मंडळे आहे. यापैकी २९ महसूल मंडळात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. केवळ २१ महसूल मंडळात पेरणीयोग्य पाऊस झाला. जून महिन्याच्या शेवटीशेवटी जिल्ह्याच्या ठिकाणी थोडापाऊस झाला. याच पावसाच्या भरोवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, आता पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याची शक्यता स्थिती तयार झाली. जिल्ह्याचे खरीपा हंगामातील एकूण क्षेत्र ४ लाख ९० हजार हेक्टर आहे. जून महिन्यात ७ हजार २३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. केवळ या महिन्याच्या शेवटी पाऊस झाला. याच पावसाच्या भरोवशावर काही शेतकऱ्यांनी पेरणी उरकून टाकली. आता पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
आठ-दहा गावांतच ९० मी. मी.पाऊस
जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पाऊस येतो. मात्र, यंदा जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. मात्र, हा पाऊसही पुरेसा झाला नाही. जून महिन्याच्या २६ दिवसांत जिल्ह्यात केवळ ४२.८ मी.मी. पाऊस झाला. त्यातही केवळ सात ते दहा गावांतच ७५ ते १०० मीमी पाऊस झाला. अन्य ठिकाणी अजूनही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही.
यंदाचे पेरणी उद्दिष्ट गाठणार काय ?
जिल्ह्यात ६५ हजार क्षेत्रावर पेरणी झाली. त्यात भात ३५३३ हेक्टर, कापूस ४८७७६, तूर ४५२८, तर सोयाबीन ८८१० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. यंदा चार लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र खरीपाचे आहे. यात एक लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात आणि कापूस, तर ८० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आहे.
आतापर्यंतच्या पेरणीची स्थिती (हेक्टरी)
भात- ३ हजार ५३३
कापूस- ४८ हजार ७७६
तूर- ४ हजार ५२८
सोयाबीन- ८ हजार ८१०
‘पावसाअभावी पेरणा रखडल्या आहेत. जमिनीत पुरेसा ओलावा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची वाट बघावी. पेरणीसाठी घाई करणे योग्य नाही. ऊन तापल्यास दुबार पेरणीचा धोका आहे.’
- शंकर तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर