२९० गणेश मंडळांनाच परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 10:45 PM2018-09-11T22:45:34+5:302018-09-11T22:46:00+5:30
गणेशोत्सवासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना जिल्ह्यातील केवळ २९० गणेश मंडळांनीच कार्यक्रमाच्या परवानगीसाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयात आॅनलाईन अर्ज सादर केला आहे. आॅनलाईन परवानगी घेण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी निरुत्साही आहेत. त्यामुळे ही संख्या घटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
परिमल डोहणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गणेशोत्सवासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना जिल्ह्यातील केवळ २९० गणेश मंडळांनीच कार्यक्रमाच्या परवानगीसाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयात आॅनलाईन अर्ज सादर केला आहे. आॅनलाईन परवानगी घेण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी निरुत्साही आहेत. त्यामुळे ही संख्या घटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये ७५० ते ८०० गणेश मंडळ प्रासंगिक तर १५ स्थायी गणेश मंडळ आहेत. या मंडळांना गणेशोत्सवासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयातून परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी शासनाने ‘चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट ईन’ हे संकेतस्थळ सुरु केले आहे. संकेतस्थळावर संपूर्ण कागदपत्रांसह आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. सद्यस्थितीत केवळ २९० गणेशमंडळानी धर्मदाय आयुक्तांकडे परवानगीसाठी अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे आॅनलाईन परवानगी घेण्यासाठी गणेश मंडळ निरुत्साही दिसून येत आहेत.
दुर्गापूर, बल्लारपूर व गोंडपिपरीत एकही अर्ज नाही
सिटीझन पोर्टलद्वारे सर्व कागदपत्रासह आॅनलाईन अर्ज करणे गरजचे आहे. गणपती उत्सवासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. पण दुर्गापूर, बल्लारपूर व गोंडपिपरीतील एकाही गणेश मंडळांने संकेतस्थळावर अर्ज केला नाही. चंद्रपूर शहर पोलीस ठाणे, तळोधी, शेगाव, चिमूर, सावली, माजरी पोलीस ठाण्याअंतर्गत प्रत्येकी एक, राजुरा नागभीड, भद्रावती पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन, मूल येथे चार, घुग्घुस आठ, रामनगर नऊ, ब्रह्मपुरी सहा, सिंदेवाही आठ, गडचांदूर १२, वरोरा २५ आणि पडोली १७ गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज सादर केला आहे.
सिटीझन पोर्टलद्धारे ३० मंडळांना परवानगी
गणेश मंडळांची अडचण दूर करण्यासाठी पोलीस विभागाने सिटीझन पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलद्वारे जिल्ह्यातील गणेश मंडळांनी आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले होते. मात्र केवळ १०१ गणेश मंडळांनी आॅनलाईन अर्ज सादर केला. त्यापैकी ३० मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.