एक दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 05:00 AM2022-05-09T05:00:00+5:302022-05-09T05:00:20+5:30
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अपघात तसेच इतर रुग्णांची संख्या अधिक असते. रक्तदात्यांची संख्या नेमकी याच दिवसात घटत असल्याने रक्त तुटवडा निर्माण होतो. यावर्षी तर मेच्या सुरुवातीपासूनच रक्त तुडवड्याचा सामना येथील रुग्णांना करावा लागत आहे. दाता द्या, रक्त न्या, अशी अवस्था येथे निर्माण झाली आहे. त्यातच आता तर एक ते दोन दिवस पुरेल एवढेच रक्त सध्या शासकीय रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहे.
साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागणीच्या तुलनेमध्ये रक्तसाठा कमी होत असल्याने येथील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रचंड रक्त तुडवडा आहे. एक ते दोन दिवस पुरेल एवढेच रक्त सध्या येथे उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर तसेच नियमित रुग्णांना रक्तपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न सध्या रक्तसंक्रमण अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना पडला आहे. सामाजिक संस्था, राजकीय पक्ष संघटनांनी पुढाकार घेत रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तटंचाईवर मात करणे सध्या तरी गरजेचे झाले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अपघात तसेच इतर रुग्णांची संख्या अधिक असते. रक्तदात्यांची संख्या नेमकी याच दिवसात घटत असल्याने रक्त तुटवडा निर्माण होतो. यावर्षी तर मेच्या सुरुवातीपासूनच रक्त तुडवड्याचा सामना येथील रुग्णांना करावा लागत आहे. दाता द्या, रक्त न्या, अशी अवस्था येथे निर्माण झाली आहे. त्यातच आता तर एक ते दोन दिवस पुरेल एवढेच रक्त सध्या शासकीय रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहे. गंभीर रुग्णांना वेळीच रक्त मिळण्यासाठी आता समाजातील रक्तदात्यांनी समोर येऊन रक्तदान करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कडक उन्हामुळे अनेकांची पाठ
मागील काही वर्षांमध्ये रक्तदानासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. अनेक जण रक्तदान करण्यास इच्छुकही आहेत. ते नियमित रक्तदानही करतात. मात्र सद्य:स्थितीत पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. अशा वेळी नागरिक रक्तदान करण्यास पाठ फिरवीत आहेत.
अनेकांना पत्र
रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांनी सामाजिक संस्थांना पत्र पाठवून रक्तदान करण्याची विनंती केली आहे.
रुग्णांची गैरसोय
रक्तसाठा कमी असल्याने जिल्ह्यातील काही रुग्णांची गैरसेय होत आहे.
रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांची चिंता वाढली
येथील रक्तसंक्रमण विभागामध्ये एक ते दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना रक्तपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे. सामाजिक संस्था, संघटनांना पत्र पाठवून येथील अधिकारी, कर्मचारी रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन करीत आहेत. मात्र उन्हामुळे शिबिराची संख्याही रोडावली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तदात्यांची संख्या कमी असते. अशा वेळी रक्तटंचाईचा सामना करावा लागतो. सामाजिक जबाबदारी म्हणून राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांनी रक्तदान शिबिर आयोजित करावे. यामुळे नियमित रुग्ण, गंभीर रुग्णांना रुक्तपुरवठा करणे शक्य होईल. रक्तदान शिबिर आयोजित करावे, यासाठी अनेकांना पत्र पाठवून विनंती करण्यात आली आहे.
- डाॅ. अनंत हजारे,
रक्तसंक्रमण अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर