चंद्रपूर जिल्ह्यात यंदा धानाचे एकरी उत्पन्न केवळ पाच पोती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:31 AM2017-12-04T11:31:02+5:302017-12-04T11:34:14+5:30
यंदा पावसाने दगा दिला. त्यानंतर विविध रोगांनी धानपिकांवर आक्रमण केल्याने अर्धेअधिक धान पीक नष्ट झाले. त्यामुळे एकरी चार ते पाच पोते धान पीक शेतकऱ्यांच्या हाती आले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : यंदा पावसाने दगा दिला. त्यानंतर विविध रोगांनी धानपिकांवर आक्रमण केल्याने अर्धेअधिक धान पीक नष्ट झाले. त्यामुळे एकरी चार ते पाच पोते धान पीक शेतकऱ्यांच्या हाती आले. यावर्षी धान उत्पादनात प्रचंड घट आली असून एकरी १५ हजार रूपये खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात पाच हजाराचे उत्पन्न आल्याने शेतकरी कमालीचा हादरला आहे.
बल्लारपूर तालुक्यात मानोरा कवडजई, किन्ही, कोेर्टी, पळसगाव, आमडी, कळमना, दहेली, बामणी, आसेगाव, गिलबिली, मोहाडी तुकूम, इटोली व कोठारीसह अनेक गावात हजारो हेक्टरवर धानपिक घेतल्या जाते. या भागात धान पीक प्रमुख असून मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या जिवारी आला आहे. शेतीसाठी विविध बँका, सहकारी सोसायट्या व सावकारी खाजगी कर्जाची उचल केल्याने कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे. त्यात उत्पन्नात कमालीची घट आल्याने मुलांचे शिक्षण, लग्न आणि कुटुंबाचा उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पीक हाती येण्याच्यावेळी भातावर मावा-तुडतुडा, करपा, खोडकिडा, गेवरा आदी रोगाने धानपिकांवर आक्रमण केले व उभे पीक नष्ट झाले. यामुळे शासनाने भरपाई देण्याची मागणी आहे.
हेक्टरी २५ हजार रूपये आर्थिक मदत द्या
निसर्गाच्या लहरीपणामुळे व धानपिकांवर आलेल्या विविध रोगाने त्याचा गंभीर परिणाम उत्पादनावर झाला. अर्ध्यापेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे सर्वे करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयाची मदत शासनाने जाहीर करण्याची मागणी कोठारीचे सरपंच मोरेश्वर लोहे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकऱ्यानेच धानपिक जाळले
कोठारीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या बामणी येथील तरुण शेतकरी शैलेश रामटेके याने जंगली जनावरांच्या त्रासामुळे व धानावर आलेल्या विविध रोगामुळे त्रस्त होवून उभे धानपिक जाळून टाकले आहे.