पाटणच्या शासकीय आश्रम शाळेत केवळ पाच विद्यार्थी
By admin | Published: September 24, 2015 01:22 AM2015-09-24T01:22:10+5:302015-09-24T01:22:10+5:30
आदिवासी मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावी, या हेतुने राज्य शासनातर्फे शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात.
शाळा बंद अवस्थेत : अनेक विषयाच्या शिकवणीचा श्रीगणेशाच नाही
फारुख शेख पाटण
आदिवासी मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावी, या हेतुने राज्य शासनातर्फे शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. परंतु कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाचा फटका आदिवासी मुलामुलींना बसत असून अनेक विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले जात आहे. ही स्थिती पाटण येथील शासकीय आश्रम शाळेवरून दिसून येत असून येथील आश्रम शाळा गेल्या सहा दिवसांपासून विद्यार्थी नसल्याने बंद अवस्थेत आहे.
जिवती तालुक्यातील पाटण येथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शाळा असून आदिवासी मुलामुलींना वसतीगृहाची सोय आहे. आज घडीला येथे कागदोपत्री २५२ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. परंतु शिक्षकांची शिकविण्याची पद्धत, वसतीगृहातील गैरसोय यामुळे विद्यार्थी शाळेत जाण्यास नकार देत आहेत.
दहावीच्या हिंदी, गणित, भूमिती या मुख्य विषयांच्या ज्ञानार्जनाला अद्याप सुरूवातच झालेली नाही. तर काही विषय शिकविण्यासाठी शिक्षकच नाही, असे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’पुढे बोलून दाखविली. ११ व १२ सप्टेंबर पोळा या सणानिमित्त विद्यार्थी गावी गेले. मात्र विद्यार्थी अद्यापही शाळेत परत आलेले नाही. आज घडीला शाळेत केवळ पाच विद्यार्थी असून सहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने १९ सप्टेंबरला शाळेला भेट दिली असता, अनेक बाबी समोर आल्या.