वरोरा परिसरातील माळढोक मोजतोय अखेरच्या घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 01:33 PM2022-02-23T13:33:43+5:302022-02-23T13:48:06+5:30
वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने टेमुर्डा, डोंगरगाव, चिकणी, वनोजा, आष्टी, मार्डा या गावांच्या शेतशिवारात शोधमोहीम राबविली होती. त्यात मार्डा परिसरात २००४ मध्ये सहा माळढोक आढळून आले.
प्रवीण खिरटकर
वरोरा (चंद्रपूर) : माळढोक (Great Indian bustard) पक्षी जगात अत्यंत दुर्मिळ समजला जातो. अठरा वर्षांपूर्वी सहा माळढोक वरोरा परिसरात आढळून आले होते. त्यावेळी पक्षीमित्रांनी मोठा आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर क्वचितच हा पक्षी या परिसरात दिसतो. दोन वर्षांनंतर आता १९ जानेवारीला एक माळढोक पक्षी या परिसरात दिसला. संख्या कमी होत असल्याने हा पक्षी या परिसरातूनही नामशेष होणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
माळढोकचे वास्तव्य वरोरा परिसरात असल्याची नोंद ब्रिटिश राजवटीत वनविभागाकडे केली होती. दरम्यान, अलीकडे वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने टेमुर्डा, डोंगरगाव, चिकणी, वनोजा, आष्टी, मार्डा या गावांच्या शेतशिवारात शोधमोहीम राबविली होती. त्यात मार्डा परिसरात २००४ मध्ये सहा माळढोक आढळून आले. त्यात दोन नर व चार मादी होत्या. त्यानंतर हे सहा माळढोक पक्षी नेहमीच दिसत होते. नंतर भद्रावती तालुक्यातील भटाळी परिसरात दोन माळढोक पक्षी आढळून आले. त्यावेळी एक अंडेही मिळाले होते. या परिसरात या पक्ष्याचे वास्तव्य कायम राहावे, यासाठी वनविभागाकडून सातत्याने जनजागृती करण्यात आली. शेतकऱ्यांना जैविक खते देण्यात आली. मात्र, कालांतराने याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या पक्ष्यांची संख्या वाढणे अपेक्षित असताना ती मंदावली आहे.
कोळसा खदान अन् उद्योगामुळे पक्ष्याला धोका
माळढोक पक्ष्यांची संख्या वाढली पाहिजे, याकरिता वनविभाग संवर्धन करते; परंतु ज्या भागात माळढोकचे वास्तव्य आहे, त्या परिसरात नव्यानेच एक कोळसा खदान व दोन मोठे उद्योग सुरू झाले. माळढोक पक्षी विमानाप्रमाणे उडाण घेतो. त्याच पद्धतीने उतरतो. त्यामुळे त्याला जागा कमी पडत असल्याचे मानले जात आहे.
चीप लावलेला माळढोक बेपत्ता
काही वर्षांपूर्वी डेहराडून येथील तज्ज्ञांनी वरोरा परिसरातील एका माळढोक पक्ष्याला चीप लावून सोडले होते. त्याचे लोकेशन डेहराडून कार्यालयात दिसत होते. त्यामुळे स्थानिक वनविभाग नेहमी याबाबत अनभिज्ञ राहायचा. आता हा पक्षी व त्याचे लोकेशनही दिसत नाही.
१९ जानेवारी २०२२ रोजी वरोरा परिसरात एक माळढोक पक्षी दिसल्याची नोंद आहे. माळढोकच्या संवर्धनाकरिता वन विभागाची चमू नेहमी कार्यरत असते.
-मधुकर राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा.