धान खरेदीचा केवळ मुहूर्तच
By admin | Published: November 14, 2016 12:50 AM2016-11-14T00:50:38+5:302016-11-14T00:50:38+5:30
जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वी दि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने धान खरेदी सुरू केली आहे.
दोन शेतकरी आले : ८९ क्विंटल धानाची झाली खरेदी
चंद्रपूर : जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वी दि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने धान खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी मुहूर्ताला ८९.६० क्विंटल धान खरेदी करण्यात आली. यावेळी केवळ दोन शेतकऱ्यांना धान आणण्यात आला होता. त्यानंतर शेतकरी खरेदी केंद्रावर फिरकलेले नाहीत.
मार्केटिंग फेडरेशनतर्फे २४ आॅक्टोबर रोजी सिंदेवाही, ब्रह्मपुरी व नागभीड येथील सहकारी खरेदी-विक्री संस्था, कोधो येथील श्रीगुरूदेव सहकारी राईस मिल, सावली येथील विविध कार्यकारी संस्थेमध्ये धान खरेदी सुरू करण्यात आली. या पाच खरेदी केंद्रांपैकी केवळ सिंदेवाही येथील खविसंने दोन शेतकऱ्यांकडून ८९.६० क्विंटल धानाची खरेदी केली आहे. हा सर्वसाधारण दर्जाचा धान असल्याने १४७० रुपये ते १५१० रुपये यादरम्यान आधारभूत किंमत देण्यात आली. त्या दराने धान विक्री करणाऱ्या दोन शेतकऱ्यांना १ लाख ३१ हजार २१२ रुपये अदा करण्यात आले. २४ नोव्हेंबरनंतर मार्केटिंग फेडरेशनने ७ नोव्हेंबर रोजी मूल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, व्याहाड (खु) व व्याहाड (बु.), नवरगाव येथील विविध कार्यकारी संस्था, ब्रह्मपुरी येथील खविसं, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि चंद्रपूर जिल्हा कृषी औद्योगिक संघ व बरडकोनी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या सर्व धान खरेदी केंद्रावर ११ नोव्हेंबरपर्यंत धान विक्री करण्यासाठी कोणीही शेतकरी आलेला नव्हता. (प्रतिनिधी)
दर्जेदार धानाला २७७५ रुपये भाव
धानाची वेगवेगळी प्रतवारी करण्यात आली आहे. त्यामध्ये दर्जेदार धानाला २७७५ रुपये आधारभूत भाव देण्यात येत आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात दर्जेदार धानासह सर्वसाधारण दर्जाचे धान उत्पादन होत असते. सर्वसाधारण धानाला १४७० रुपये व ‘अ’ दर्जासाठी १५१० रुपये आधारभूत किंमत देण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वसाधारण दर्जाचा धान खरेदी केंद्रावर आणण्यात येत असल्याने त्याची आधारभूत किंमतदेखील कमी आहे.
आधारकार्ड व लिंकिंग बँक खाते आवश्यक
खरेदी केंद्रावर धान आणताना शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी आधारकार्ड व आधार लिंक केलेले बँक खाते आवश्यक करण्यात आले आहे. याशिवाय चालू वर्षीचा सातबाराही सोबत आणायचा आहे. शेतीचा सातबारा उतारा पाहूनच धान खरेदी करण्यात येत आहे. खरेदी केंद्रावर आणलेल्या धानाची आर्द्रता १७ टक्क्यांपेक्षा अधिक नको. त्यापेक्षा अधिक ओलावा असणारा धान आणि बुरशीयुक्त धानदेखील स्वीकारण्यात येणार नाही.
आदिवासी महामंडळातर्फेही खरेदी
दि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने १३ केंद्रांवर धान खरेदी सुरू केली आहे. याशिवाय आदिवासी महामंडळातर्फेदेखील धान खरेदी सुरू करण्यात आली आहे. आदिवासी महामंडळाने १९ खरेदी केंद्र उघडले आहेत. खरीप हंगामाची धान खरेदी ३१ मार्च २०१७ रोजीपर्यंत सुरू राहणार आहे.
शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीलाच धान विक्री करावी. त्यांनी दलालांच्या जाळ्यात अडकू नये. धान १७ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता असलेले धान विक्रीसाठी आणू नये. यावर्षी परतीच्या पावसामुळे धानाचे पीक उशिरा आले आहे. सध्या धानाचे पुंजने तयार करणे सुरू आहे. १५ नोव्हेंबरनंतर धान खरेदीमध्ये वाढ होईल.
-अनिल गोगीरवार, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, दि महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन,