ताडाेबात पर्यटनासाठी दाेन्ही डाेस बंधनकारक, मास्कशिवाय 'एन्ट्री' नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 10:36 AM2022-01-06T10:36:24+5:302022-01-06T11:12:57+5:30
Tadoba-Andhari Tiger Reserve : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ७ जानेवारीपासून अंशत: निर्बंध लागू करण्यात आले आहे. यात प्रकल्पात येणाऱ्या पर्यटक, निसर्ग मार्गदर्शक, गेट मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले असावे. अन्यथा पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार नाही
चंद्रपूर :ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याकरिता मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मात्र जंगल सफारी करीत असताना कोविडचे नियम पाळले जात नसल्यामुळे कोविड-१९ विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाकरिता ७ जानेवारीपासून अंशत: निर्बंध लागू करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेश निर्गमित केले आहे. नियम न पाळल्यास दंड आकारण्यात येणार आहे.
पर्यटक, निसर्ग मार्गदर्शक, गेट मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले असावे. अन्यथा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार नाही, एकाच कुटुंबातील किंवा सोबत प्रवास करणारे, सोबत राहणारे पर्यटकांना प्रचलित नियमानुसार सफारी करता येईल. इतरांसाठी ४ पर्यटक प्रती जिप्सी वाहन यानुसार मर्यादेत सफारी करता येणार आहे.
प्रत्येकाने मास्क लावणे व सोबत रुमाल ठेवणे आवश्यक राहील. मास्कशिवाय प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार नाही. मास्क सोबत घेऊन येण्याची जबाबदारी ही संबंधित वनकर्मचारी, पर्यटक, जिप्सी चालक व मार्गदर्शक यांची राहील. कोणत्याही परिस्थितीत वापरलेला मास्क, हातमोजे, फेस शिल्ड, पाण्याच्या बॉटल्या, इत्यादी साहित्य वनक्षेत्रात अथवा अन्यत्र फेकले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. सफारी दरम्यान सुद्धा मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
प्रवेशव्दारांवर गर्दी होऊ नये, याकरिता दोन वाहनांमध्ये किमान १५ फूट अंतर ठेवण्यात यावे. शिवाय पर्यटकांना प्रवेश देताना वाहनांना प्रचलित वेळेच्या अर्धा तास आधी प्रवेश व अर्धा तास आधी बाहेर निघण्याची मुभा राहणार आहे. त्यानुसार प्रवेशाकरिता स्लॉटची आखणी करण्यात येणार आहे.
प्रवेशद्वारातून पर्यटकास प्रवेश देण्यापूर्वी सर्व पर्यटक, जिप्सी चालक, मार्गदर्शक यांचे शरीराचे तापमान हे थर्मल स्कॅनर, इन्फ्रारेड थर्मामीटरने तपासण्यात येणार आहे. ताप-सर्दी खोकला असलेल्या, आजारी असलेल्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.