तालुक्यातील एकमेव विसापुरातील जि. प. हायस्कूल बंद होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:33 AM2021-08-14T04:33:33+5:302021-08-14T04:33:33+5:30
सुभाष भटवलकर विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर सर्वात मोठे गाव आहे. गावाची लोकसंख्या १७ हजारांवर आहे. गावात विद्यार्थीसंख्यादेखील बरी ...
सुभाष भटवलकर
विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर सर्वात मोठे गाव आहे. गावाची लोकसंख्या १७ हजारांवर आहे. गावात विद्यार्थीसंख्यादेखील बरी आहे. मात्र येथील जि. प. हायस्कूलकडे विद्यार्थी व पालकांनी पाठ फिरवली आहे. परिणामी वर्ग ५ ते १० पर्यंत केवळ ३२ विद्यार्थी आहेत. पाचपैकी तीन शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामुळे विसापूर येथील जि. प. हायस्कूल बंद होण्याच्या मार्गावर आहे.
विसापूर गावात शिक्षणाची निकड लक्षात घेऊन १९७० ते १९७२ दरम्यान जि. प. हायस्कूल सुरू करण्यात आले. १९८० ते १९८३ दरम्यान हायस्कूलसाठी नवीन इमारत बांधण्यात आली. त्यावेळी शाळेत विद्यार्थीसंख्यादेखील बरी होती व शिक्षणाचा दर्जासुद्धा चांगला होता. त्यावेळी जि. प. शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी उच्च पदांवर झेप घेतली होती. काही प्राथमिक शिक्षकांचे चंद्रपूरच्या खासगी शाळेशी हितसंबंध आल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश घेण्यासाठी समुपदेशन करणे सुरू केल्याने विद्यार्थ्यांचा कल तिकडे वाढला. जि. प. शिक्षकांनी दुर्लक्ष केल्याने गावातील जि. प. हायस्कूल तग धरू शकले नाही. त्यामुळे शाळेला उतरती कळा लागली. ग्रामपंचायत विसापूर जि. प. हायस्कूल सुरू राहावे, म्हणून प्रयत्नशील आहे. विसापूर येथील अनेक विद्यार्थ्यांना उच्च पदांवर नेणारे जि. प. हायस्कूल बंद होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
बॉक्स
अशी आहे विद्यार्थीसंख्या
विसापूर येथील जि. प. हायस्कूलमधील वर्ग ५ मध्ये केवळ ४, वर्ग ६ मध्ये ६, वर्ग ७ मध्ये ६, वर्ग ८ मध्ये ५, वर्ग ९ मध्ये ४, तर वर्ग १० मध्ये ८ पटसंख्या आहे. जि. प. हायस्कूल एकूण वर्ग सहा असून, विद्यार्थी पटसंख्या केवळ ३२ आहे. हे विसापूर गावातील जि. प. हायस्कूलचे दुर्दैव आहे.