शहरातील उघडे चेंबर धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:36 AM2021-02-25T04:36:11+5:302021-02-25T04:36:11+5:30
हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणात वाढ चंद्रपूर : वाहनांवर कर्णकर्कश हॉर्न लावण्यासाठी आणि भररस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, प्रेशर हॉर्न ...
हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणात वाढ
चंद्रपूर : वाहनांवर कर्णकर्कश हॉर्न लावण्यासाठी आणि भररस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईची तरतूद करण्यात आली असताना, या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून, जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याशिवाय सध्या बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे कंत्राटदार ट्रकांद्वारे ओव्हरलोड वाळू व मुरुम वाहतूक करीत असल्याने याचा फटका रस्त्यांना बसत आहे.
आवळगाव ते कोसंबी रस्त्याची दुरवस्था
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव ते कोसंबी रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या संपूर्ण रोडची गिट्टी उखडलेली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
कव्हरेजअभावी भ्रमणध्वनी सेवा ठप्प
चंद्रपूर : शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात भ्रमणध्वनी ग्राहक आहेत. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कव्हरेजची समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त झालेले असून, अनेकांनी सिम कार्ड बदलवून नवीन सिम खरेदीला पसंती दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून काही कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये समस्या निर्माण झाली आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
घुग्घुस : परिसरात वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. या समस्येकडे वीजवितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक शासकीय कामे खंडित होत आहे, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
घुग्घुस तालुका निर्मितीचा प्रश्न प्रलंबित
घुग्घुस : जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या घुग्घुस शहराला तहसीलच्या दर्जा देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. घुग्घुस हे औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. चंद्रपूर तालुक्याचा वाढता कारभार बघता स्वतंत्र तालुक्याची निर्मिती करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महागाईमुळे सामान्य ग्राहक त्रस्त
चंद्रपूर : मागील काही महिन्यांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच महागाईमुळे जगण्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शकाचा अभाव
कोरपना : राजुरा ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खिर्डी ते राज्य सीमेदरम्यानच्या मार्गावर दिशादर्शक व अंतर फलक नसल्याने वाहतूकदारांची गैरसोय होत आहे. सदर महामार्ग जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीच्या महामार्गापैकी एक आहे. त्यामुळे दिवसरात्र या मार्गावरून ये-जा सुरू असते, परंतु दिशादर्शक, अंतर, वळण, गावाचे नाव असे मार्गदर्शक फलक लावण्यात आले नाही.
धूर फवारणी करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. महापालिका प्रशासनाने डासांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, काही मोकळ्या भूखंडावर आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे याचाही धोका नागरिकांना आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. डेंग्यूचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
चालत्या वाहनावर मोबाइलचा वापर धोकादायक
सिंदेवाही : वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण करणे कायद्याने गुन्हा आहे, परंतु आजही अनेक जण महामार्गावरील, तसेच शहरातील रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण करताना दिसून येत आहेत. हा प्रकार त्यांच्या व इतरांसाठीही धोकादायक ठरणारा आहे. पोलिसांनी वाहन थांबवून थातुरमातुर कारवाई करण्याऐवजी योग्य ती कारवाई केल्यास होणाऱ्या अपघातांपासून सुटका तरी होऊ शकते, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बाबूपेठ परिसरात कचऱ्याचे ढिगारे
चंद्रपूर : स्थानिक बाबूपेठ व नगिनाबाग परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. काही ठिकाणी कचराकुंड्या नसल्याने, तसेच घंटागाडी येत नसल्याने बरेच जण मोकळ्या जागेवर कचरा टाकतात. हा कचरा उचलण्यात आला नाही. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
तुकूम परिसरातील नाल्यांचा उपसा करावा
चंद्रपूर : तुकूम परिसरातील विविध वाॅर्डात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वॉर्डातील नाल्यांचा उपसा होत नाही. त्यामुळे त्या तुडुंब भरल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. डासांचे प्रमाण वाढून आजार होऊ शकतात. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. शहरात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ होत आहे. त्यामुळे भीती पसरली आहे.
रोहयोची कामे देण्याची मागणी
चंद्रपूर : औद्योगिक जिल्हा अशी चंद्रपूरची ओळख असली, तरी ग्रामीण भागामध्ये आजही रोजगारासाठी बेरोजगार, तसेच मजुरांना भटकंती करावी लागते. त्यामुळे गावागावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. बेरोजगारीमुळे अनेक जण परराज्यात जात आहेत.
आसोला येथे बस स्थानकाची मागणी
शंकरपूर : येथून जवळच असलेल्या आसोला येथे बस स्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथे बस स्थानक बनविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आसोला हे गाव भिसी कांन्पा या राज्य महामार्गावर वसले असून, सहाशे लोकवस्तीचे हे गाव आहे. या ठिकाणी बस स्थानक होते, परंतु पाच वर्षे आधी आलेल्या वादळाने बस स्थानकाची पूर्णपणे मोडतोड झाली होती. तेव्हापासून हे गाव बस स्थानकविरहित आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून येथे शासनाने बस स्थानक बांधून द्यावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.
बुफे पद्धतीत अन्नाची नासाडी
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे अगदी कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणारे समारंभ आता कोरोना संकट कमी होत असतानाही पुन्हा जुन्याच पद्धतीनुसार जास्त पाहुणे बोलावून केले जात आहेत. मात्र, यामध्ये अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून, यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. लग्नसोहळा व कोणताही कार्यक्रम जेवणाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आज या जेवणावळीचे स्वरूप बदलले असून, पंगतीची जागा आता बुफेने घेतली आहे. मात्र, या पद्धतीने अन्नाची नासाडी होत आहे.
शासकीय कार्यालयांतून तक्रारपेट्या गायब
चंद्रपूर : शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी असतात. आपल्या तक्रारी वरिष्ठांसमक्ष जाणार या हेतूने संबंधित विभागाच्या प्रशासनाच्या दिशानिर्देशाने बहुतांश शासकीय कार्यालयांत तक्रारपेट्या लटकविलेल्या दिसायच्या. मात्र, आता या तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. संबंधितांची तक्रार करावी कुठे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे.
विनानंबर प्लेटने धावतात वाहने
चंद्रपूर : रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी व सुरळीतपणे होण्यासाठी परिवहन विभाग प्रत्येक स्वयंचलित दुचाकी व चारचाकी वाहनांना विशिष्ट नंबर देतात, परंतु अलीकडे जिल्ह्यात विनानंबरच्या नवीन गाड्यांसोबतच विनानंबरची अनेक जुनी वाहनेही रस्त्यावरून धावताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर नागपूर रस्त्यावर स्टंटबाजी करताना, एका निरपराध दुचाकीस्वाराचा अपघात झाला. यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या घटनेकडे लागले होते. दरम्यान, पोलीस प्रशासनाने स्टंटबाजी करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, बिनानंबर प्लेट वाहनचालक बिनधास्तपणे आपले वाहन दामटत आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे.