उघड दार देवा आता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:19 AM2021-06-21T04:19:45+5:302021-06-21T04:19:45+5:30
चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संचारबंदीनंतर मंदिर पुन्हा एप्रिल महिन्यांपासून लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे भाविकांना केवळ कळसाचे दर्शन घेऊनच ...
चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संचारबंदीनंतर मंदिर पुन्हा एप्रिल महिन्यांपासून लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे भाविकांना केवळ कळसाचे दर्शन घेऊनच समाधान मानावे लागत आहे. आता कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिरेही खुली करण्याची मागणी केली जात आहे.
कोरोनामुळे मागीलवर्षी लाॅकडाऊन करण्यात आले. त्यानंतर मंदिरासह सर्व बंद होते. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर सर्व व्यवहारांसह मंदिरेही सुरु करण्यात आली. दरम्यान, पुन्हा यावर्षीही कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. यावेळीही मंदिरे बंद करण्यात आली. आता सर्व व्यवहार सुरु झाले आहे. मात्र मंदिरे सुरु करण्यासंदर्भात शासनाने अद्यापही निर्णय घेतला नाही. परिणामी भक्तांना घरूनच दर्शन घ्यावे लागत आहे. तर मंदिरावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचे तसेच पुजारी यांचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास येथील महाकाली मंदिर, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, विठ्ठल मंदिर, एकविरा देवी मंदिरासह अनेक मंदिर आहे. मात्र कोरोनामुळे या सर्व मंदिरांमध्ये भाविकांना येण्यावर निर्बंध आहे.
येथील महाकाली देवी मंदिरात तर सर्व दिवस भाविकांची गर्दी असते. त्यातच चैत्र महिन्यात तसेच नवरात्रामध्ये अधिक गर्दी होते. यात्रेदरम्यान, विदर्भ, मराठवाडा तसेच अन्य राज्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे शेकडो व्यावसायिक यावर अवलंबून असतात. मागील वर्षी तसेच यावर्षी सुद्धा यात्रा भरली नाही. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. तर भाविकांनाही दर्शन घेता येत नसल्यामुळे आता भाविकही दर्शनासाठी आतूरले आहे. त्यामुळे शासनाने मंदिरांवरील निर्बंध हटवून मंदिरे सुरु करावीत, अशी मागणी केली जात आहे.
बाॅक्स
आर्थिक गणित कोलमडले
मंदिर बंद असल्यामुळे भाविकांची वर्दळ पूर्णत: थांबली आहे. भाविक येत नसल्यामुळे व्यवसायही बंद आहे. जिल्हा प्रशासनाने सध्या निर्बंध उठविले आहे. मात्र मंदिर बंद असल्यामुळे कोणीच येत नाही. त्यामुळे व्यवसाय पूर्णत: कोलमडले आहे. त्यामुळे डोक्यावरील कर्ज, घरसंसार कसा चालवायचा असा प्रश्न आहे.
-नरेंद्र आवटे
चंद्रपूर
कोट
मंदिरासमोर पूजेचे साहित्य विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मात्र मागील वर्षी तसेच यावर्षी मंदिर बंद आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी यायचे यातून बऱ्यापैकी कमाई होत होती.
वासुदेव कुंटे, चंद्रपूर
--
कोरोना संकटामुळे मंदिर बंद आहे. त्यामुळे प्रत्येकाचेच नुकसान झाले आहे. मंदिर सुरु करण्या संदर्भात शासनाने निर्णय घ्यावा. आता नागरिकांनाही कोरोनाची भीती आहे. त्यामुळे मंदिरात गर्दी होणार नाही. मात्र एकूणच सर्व व्यवहार सुरु होतील. लग्न, पूजापाठ, वास्तुशांती आदी सर्व बंद असल्यामुळे आर्थिक नुकसानही होत आहे.
-रामप्रसाद मसादे महाराज
पुजारी, साईबाबा मंदिर, चंद्रपूर
----
किती दिवस कळसाचेच दर्शन ?
मंदिर बंद असल्यामुळे देवाचे दर्शन घेता येत नाही. त्यामुळे नियमित मंदिरात जाऊन दर्शन घेणे आता पूर्णत: बंद झाले आहे. शासनाने मंदिर प्रशासनाला नियम लादून मंदिर सुरु करण्यासंदर्भात आदेश द्यावे. आता तर सर्व व्यवहार सुरु झाले आहे. त्यामुळे मंदिरही सुरु करावे.
- सतीश चहारे, चंद्रपूर
बाॅक्स
बाजारपेठ सुरु झाली आहे. सर्व व्यवहारही सुरळीत सुरु आहे. त्यामुळे मंदिर बंद ठेवून काहीही उपयोग नाही. नागरिकांना कोरोनाची दहशत आहे. त्यामुळे ते नियम पाळूनच मंदिरात दर्शनासाठी जातील. मात्र मंदिर बंद ठेवून त्यांची उत्कंठा वाढविणे चुकीचे वाटते.
-गोलू खाडे, चंद्रपूर