चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ओपन जिम उरल्या नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:02+5:302021-06-22T04:20:02+5:30
मनपाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील विविध प्रभागात ५५ जिम आहे. यामध्ये २ लाख ७४ रुपये किमतीचे ...
मनपाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील विविध प्रभागात ५५ जिम आहे. यामध्ये २ लाख ७४ रुपये किमतीचे ३५ जिम उभारण्यात आले आहे. चार लाख रुपये किमतीचे १८ जिम उभारण्यात आले आहेत, तर ९ लाख किमतीचे दोन जिम उभारण्यात आले आहेत. हे जिम सुरुवातीच्या काळात त्या त्या प्रभागातील नागरिकांना व्यायामासाठी उत्तम साधन होते. सकाळी फिरायला जाणारी मंडळी या जिमवर आवर्जून जात होती. कोणतीही गोष्ट वापरात नसली की नादुरुस्त होण्याचे प्रकारही घडतात. याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनासह पदाधिकाऱ्यांची आहे. ती जबाबदारी मनपाने इमाने-इतबारे पार पाडली देखील. प्रत्येक जिममागे मनपाने ६० हजार रुपये खर्च केल्याची माहिती मनपाच्या सूत्राने ‘लोकमत’ला दिली. या ६० रुपयांचा जिमच्या देखभाल व दुरुस्तीसाठी खर्च झाला असता तर या सर्व जिम चांगल्या स्थितीत असत्या. मात्र, हा निधी कागदोपत्री खर्च झाला; परंतु त्या निधीतून प्रत्यक्षात जिमच्या दुरुस्तीची कामेच झाली नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. एका जिमवर ६० हजार या प्रमाणे ५५ जिमसाठी ३ कोटी ४ लाख रुपये मनपाने दिलेले आहे. मग जीमची अवस्था बिकट आहे तर हा निधी नेमका गेला कुठे, असा प्रश्नही मनपातील जाणकार सूत्राने उपस्थित केला आहे.