नागभीडमध्ये ओपन जिम, बगीच्यांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:19 AM2021-06-28T04:19:54+5:302021-06-28T04:19:54+5:30

नागभीड : नागभीड नगर परिषद झाल्यापासून नागभीड शहराची वाढ झपाट्याने होत आहे. वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन नगर परिषदेने ...

Open gym in Nagbhid, garden needed | नागभीडमध्ये ओपन जिम, बगीच्यांची गरज

नागभीडमध्ये ओपन जिम, बगीच्यांची गरज

googlenewsNext

नागभीड : नागभीड नगर परिषद झाल्यापासून नागभीड शहराची वाढ झपाट्याने होत आहे. वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन नगर परिषदेने ओपन जिम व छोट्या बगीच्यांच्या निर्मितीकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

गेल्या काही वर्षांत शहराभोवती अनेक वसाहती निर्माण झाल्या आहेत. यात समता कॉलनी, वसुंधरानगर, लक्ष्मीनगर, पटवारी लेआऊट, सम्राट अशोकनगर, प्रगतीनगर, विद्यानगर, आदर्श कॉलनी, मुसाभाईनगर, लालाजीनगर, फ्रेंड‌्स कॉलनी, सुंदरनगरी, सिद्धिविनायक, अशा अनेक वसाहतींचा यात समावेश आहे. अनेक वसाहती निर्माण होत आहेत, काही निर्माणाधीन आहेत.

नागभीड शहर नागपूर, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्हा स्थळांना मध्यवर्ती असल्याने अनेक चाकरनामे नागभीडला आता पसंती देऊ लागले असून येथील वसाहतीमधील भूखंडांची विक्रीही जलदगतीने होत आहे. या वसाहतींमध्ये अनेक टोलेजंग इमारती व बंगले उभे होत असले आणि लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी या वसाहतींमध्ये अद्यापही ओपन जिम व बगीच्यांची निर्मिती करण्यात आली नाही. गेल्या काही वर्षांत निवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने शहरात ज्येष्ठ नागरिकांची भर पडत आहे. या ज्येष्ठ नागरिकांना वेळ कुठे आणि कसा घालवावा, असा प्रश्न भेडसावत आहे. शहरात एखाद्या बगीच्याची निर्मिती झाल्यास ज्येष्ठ नागरिकांसमोर निर्माण होत असलेल्या समस्येचे सहज निराकरण होऊ शकते. याच बगीच्यांमध्ये ओपन जिमच्या माध्यमातून व्यायामाची साधने उपलब्ध करून दिल्यास मुले व तरुणांनाही दिलासा मिळू शकतो.

बॉक्स

२० मोकळे भूखंड

वसाहतीच्या नियमानुसार प्रत्येक वसाहतीत ‘ओपन स्पेस’ म्हणून मोकळे भूखंड ठेवण्यात आले आहेत. शहरात अशा मोकळ्या भूखंडांची संख्या २० च्या आसपास असल्याची माहिती आहे. यांतील काही मोठ्या भूखंडांवर ओपन जिम व बगीच्यांची निर्मिती करण्यात आल्यास ते सर्वांना सोयीचे ठरू शकते. नागभीड नगरपरिषदेने गेल्या तीन-चार वर्षांत ३८ कोटी रुपये किमतीची पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्ते व बाजाराच्या विकासासाठी व इतर अनेक कामांसाठी मोठा निधी मंजूर करून आणला आहे. असाच बगीच्यांच्या निर्मितीकरिता निधीसाठी शासनाकडे साकडे घालावेत अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

बॉक्स

रेल्वेच्या बालउद्यानातही सुविधांचा अभाव

येथील रेल्वे विभागाने बालउद्यानाची निर्मिती केली असली तरी या बालउद्यानात सुविधांचा अभाव आहे. येथे उपलब्ध असलेल्या काही साधनांवर रेल्वे परिसरात वास्तव्यास असलेली मुले समाधान मानून घेत आहे. रेल्वेस या उद्यानाचा विकास करण्यास अनेक संधी आहेत. मात्र रेल्वेचेही या उद्यानाकडे दुर्लक्ष आहे.

कोट

ओपन जिमसंदर्भात जिल्हा क्रीडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. हे जिम प्रत्येक प्रभागात प्रस्तावित करण्यात आले आहेत. याच ओपन जिममध्ये झाडे व इतर सुविधांची निर्मिती करून बगीचे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

- गणेश तर्वेकर, उपाध्यक्ष, नगर परिषद, नागभीड

Web Title: Open gym in Nagbhid, garden needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.