स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेच्या कक्षाचे उदघाटन
By Admin | Published: February 11, 2017 12:38 AM2017-02-11T00:38:21+5:302017-02-11T00:38:21+5:30
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या सौजन्याने बुद्धिस्ट समन्वय कृती समितीअंतर्गत संचालित ज्योतिबा फुले अभ्यासिकेतील व सदर कक्षाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
चंद्रपूर : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या सौजन्याने बुद्धिस्ट समन्वय कृती समितीअंतर्गत संचालित ज्योतिबा फुले अभ्यासिकेतील व सदर कक्षाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. हा कक्ष साडेतीन लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे.
बुद्धिस्त समन्वय कृती समितीतर्फे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनाकरीता स्पर्धा परीक्षा अभ्यासिका चालविण्यात येते. गेल्या वर्षी ही अभ्यासिका सुरू करण्यात आली. मात्र प्रसाधन कक्षाची उणीव होती. अभ्यासिकेचे संचालक विलास बनकर यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर केला.
केंद्रीय लोकसेवना आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, रेल्वे, बँक आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी विद्यार्थी करीत असतात. त्याकरिता भेलच्या कार्पोरेट सामाजिक दायित्व फंडातून निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर बांधकाम करण्यात आले. या प्रसाधन कक्षाचे उद्घाटन भेलचे महाप्रबंधक (पी.एम.डी.) संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी भेलचे वरिष्ठ महाप्रबंधक सरीन सोनडवले, स्वागत नागरी पत संस्थेचे अध्यक्ष अजय बंडीवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रदिप अडकिने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बुद्धिस्ट समन्वय कृती समितीचे अध्यक्ष हरीश सहारे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास बनकर व संचालन समितीचे सचिव अॅड. अवधूत मांगे यांनी केले. उपस्थितांचे आभार अमोल पुसाटे यांनी मानले.
कार्यक्रमाला विद्याधर लाडे, अशोक निमसरकार, रामदास रामटेके, सुधा टिपले, प्रवीण नेल्लोरी, अजय गणवीर आदी उपस्थित होते. शुद्धोधर गराडकर यांनी स्फूर्ती गीत गावून कार्यक्रमात रंगत आणली. (प्रतिनिधी)