मतदारांकडून नव्या चेहऱ्यांना संधी
By Admin | Published: April 23, 2017 12:58 AM2017-04-23T00:58:29+5:302017-04-23T00:58:29+5:30
६६ सदस्यसंख्या असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत या निवडणुकीनंतर चांगलेच परिवर्तन झाले आहे
१७ विद्यमानांना पुन्हा मनपात पाठविले
चंद्रपूर : ६६ सदस्यसंख्या असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत या निवडणुकीनंतर चांगलेच परिवर्तन झाले आहे. सत्ता पुन्हा भाजपाचीच असली तरी तब्बल ४९ नवीन चेहऱ्यांना मतदारांनी संधी देत मनपात पाठविले आहे. मागील ६६ नगरसेवकांपैकी केवळ १७ नगरसेवकांना मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे. मात्र २५ विद्यमान नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवित पुढील पाच वर्ष घरीच थांबण्याचा अप्रत्यक्ष सल्लाच मतदारांनी दिला आहे.
मनपा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ९ एप्रिलपासून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. सूर्य आग ओकत असतानाही उमेदवारांनी व सर्वच राजकीय पक्षांनी नऊ दिवस रात्रंदिवस प्रचार केला. त्यानंतर १९ एप्रिलला मतदानाची प्रक्रिया पार पडली. मनपाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यानंतरही मतदार मतदानांबाबत उदासीन दिसून आले. केवळ ५२ टक्केच मतदान झाले. दरम्यान, शुक्रवारी जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळी १०.३० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. यात भाजपाने प्रारंभीपासूनच आघाडी घेतली होती. ६६ पैकी ३६ उमेदवार निवडून आल्याने भाजपाने सत्ता स्थापनेसाठी होणारा वादविवाद येथेच संपवून टाकला. मागील पंचवार्षिकमध्ये भाजप नगरसेवकांची संख्या १६ होती. यंदा यात दुपटीने वाढ होत ती संख्या ३६ च्या घरात पोहचली आहे. काँग्रेसची मात्र मोठी घसरण झाली. मागील पंचवार्षिकमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस उदयास आला होता. तब्बल २६ नगरसेवक निवडून आले होते. यंदा मात्र काँग्रेसला केवळ १२ जागांवरच समाधान मानावे लागले.
काँग्रेसला हादरा आणि भाजपाची मुसंडी हा केवळ एकच बदल झालेला नाही. यंदा मतदारांनी अनेक विद्यमान नगरसेवकांना पसंदी दर्शविली नाही. विद्यमान नगरसेवकांपैकी यंदाच्या निवडणूक रिंगणात असलेल्या तब्बल २५ नगरसेवकांना मतदारांनी कौल दिला नाही. त्यामुळे त्यांना पुढील पाच वर्ष घरीच बसावे लागणार आहे. यात संजय वैद्य, रामू तिवारी, प्रविण पडवेकर, महेंद्र जयस्वाल, बलराम डोडाणी, आकाश साखरकर, सुनिता अग्रवाल, रत्नमाला बावणे, उषा धांडे, योगिता मडावी, बंडू हजारे, विनय जोगेकर, मनोरंजन राय, राजेश अड्डूर, संगिता पेटकुले, करीमलाला काझी, लता साव, राजकुमार उके, शिल्पा आंबेकर, सुषमा नागोसे, अजय खंडेलवाल, धनंजय हुड, अनिता कथडे, दुर्गेश कोडाम, महानंदा वाळके यांचा समावेश आहे.
मोठ्या प्रमाणात विद्यमान नगरसेवकांना मतदारांनी नाकारले असले तरी १७ विद्यमान नगरसेवकांवर जनतेने पुन्हा विश्वास ठेवला आहे. त्यांना या निवडणुकीत निवडून देऊन परत एकदा सभागृहात पाठविले आहे. या विजयी झालेल्या विद्यमान नगरसेवकांमध्ये भाजपाचे अनिल फुलझेले,संदीप आवारी, अंजली घोटेकर, देवानंद वाढई, राखी कंचर्लावार, राहुल पावडे, वसंत देशमुख, काँग्रेसचे सुरेश महाकूळकर, सुनिता लोढिया, अशोक नागापुरे, विना खनके, सकिना अन्सारी, नंदू नागरकर, प्रशांत दानव, मनसेचे सचिन भोयर आणि राजलक्ष्मी कारंगल,प्रदीप डे यांचा समावेश आहे.
उल्लेखनीय असे की या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राकाँ आणि शिवसेना या राजकीय पक्षांनी तिकीट वाटप करताना काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. मतदारांनीही त्यातील नवे चेहरे निवडून त्यांना भरघोस मते देत मनपात पाठविले. विशेष म्हणजे असे एकदोन नाही तर तब्बल ४९ नवे चेहरे मतदारांनी यंदा मनपात पाठविले आहेत. यात भाजपाचे माया उईके, शिला चव्हाण, सुभाष कासनगोट्टूवार,शितल गुरगुले, वनिता डुकरे, सोपान वायकर, वंदना जांभूळकर, अंकूश सावसाकडे, चंद्रकला सोयाम, जयश्री जुमडे, पुष्पा उराडे, , राहुल घोटेकर, छबू वैरागडे, शितल आत्राम, सविता कांबळे,वंदना तिखे, प्रशांत चौधरी, शितल कुळमेथे, राजेंद्र अडपेवार, आशा आबोजवार, अनुराधा हजारे, सतीश घोनमोडे, खूशबू चौधरी, संगिता खांडेकर, स्वामी कनकम, ज्योती गेडाम, कल्पना बगुलवार, रवी आसवानी, संजय कंचर्लावार, काँग्रेसचे संगिता भोयर, अहमद मन्सूर, निलेश खोब्रागडे, कल्पना लहामगे, ललिता रेवेल्लीवार, शिवसेनेचे सुरेश पचारे, विशाल निंबाळकर, मनसेचे सीमा रामेडवार, अपक्ष अजय सरकार, स्नेहल रामटेके, निलम आक्केवार, बीएसपीचे रंजना यादव, धनराज सावरकर, पुष्पा मून, पितांबर कश्यप, अनिल रामटेके, बंटी परचाके, राकाँचे दीपक जयस्वाल, मंगला आकरे आणि प्रहारचे पप्पू देशमुख यांचा समावेश आहे.
मतदारांनी निवडून दिलेल्या या नव्या चेहऱ्यांना आता मनपाचा कारभार चालवायचा आहे. (शहर प्रतिनिधी)
या संपूर्ण प्रभागावर भाजपाचा कब्जा
चंद्रपूर महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमत तर मिळविलेच; सोबतच अनेक प्रभागात चारपैकी चारही जागा जिंकून त्यावर प्रभागावरही निर्विवाद कब्जा केला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १ दे.गो. तुकूम, प्रभाग क्रमांक ७ जटपुरा प्रभाग, प्रभाग क्रमांक ९ नगिनाबाग, प्रभाग क्रमांक ११ भानापेठ, प्रभाग क्रमांक १६ हिंदूस्थान लालपेठ या प्रभागात भाजपाने संपूर्ण जागा जिंकून आपले वर्चस्व सिध्द केले आहे. यासोबतच बहुजन समाट पाटींने इंडस्ट्रियल इस्टेट या प्रभागातील चारही जागा जिंकून आपला ताबा मिळविला आहे.