नव्या सरपंचांना गावविकासाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:19 AM2017-10-22T00:19:42+5:302017-10-22T00:19:57+5:30
तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचा बोलबाला दिसून आला. ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसचे समर्थक सरपंचपदी निवडून आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचा बोलबाला दिसून आला. ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसचे समर्थक सरपंचपदी निवडून आले आहेत. तर भाजपा व शेतकरी संघटना समर्थकांच्या वाट्याला प्रत्येकी १ ग्रामपंचायत आली. निकालानंतर अजुनही दावे-प्रतिदावे सुरू आहेत. पण, विकासकामांचा अनुशेष शिल्लक असलेल्या या तालुक्यात थेट निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंचांना आता सामर्थ्याने निधी आणून मूलभूत गावसुधारणा करण्याची संधी मिळाली आहे.
कॉंग्रेसने राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात, भाजपाने आमदार संजय धोटे यांच्या नेतृत्वात तर शेतकरी संघटनेने माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढविल्या होत्या. कॉंग्रेस समर्थकांनी ९ पैकी अंतरगाव, विरूर (गाडे.), निमणी, बाखर्डी, माथा, कोडशी, कुकुडसाथ या ७ ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले. कवठाला ग्रामपंचायत शेतकरी संघटनेकडे तर येरगव्हान ग्रामपंचायतीवर भाजपाच्या समर्थकांनी सत्ता काबीज केली. ७ सदस्यीय माथा ग्रामपंचायतमध्ये सदस्यपदासाठी कॉंग्रेस समर्थक ३, भाजपा समर्थक २ व शेतकरी संघटना २ असे पक्षीय बलाबल आहे. सरपंचपदाच्या तिरंगी लढतीत कॉंग्रेस समर्थक कामानंद ठाकरे यांनी संघटनेच्या रमेश खाडे व भाजपा समर्थक शशिकांत आडकीने यांचा प्रभाव केला. ९ सदस्यीय अंतरगाव ग्रामपंचायतमध्ये कॉंग्रेस समर्थक ६, भाजपा २ व शेतकरी संघटना १ असे पक्षीय बलाबल आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस समर्थक सरिता पोडे यांनी संघटनेच्या रंजना वडस्कर यांनी यांचा पराभव केला. कुकुडसाथ ग्रामपंचायतमध्ये वंदना याश्वान चावले विजयी झाल्या असून तिरंगी लढतीत त्यांनी शेतकरी संघटनेच्या ममता गेडाम व भाजपाच्या कल्पना ठाकरे यांचा पराभव केला. ९ सदस्यीय बाखर्डी ग्रामपंचायतमध्ये कॉंग्रेस,४, भाजपा, ३ व शेतकरी संघटना, २ असे पक्षीय बलाबल असून सरपंच पदाच्या तिरंगी निवडणुकीत संघटनेच्या भाग्यश्री अरुण रागीट व भाजपा समर्थक रंजना काकडे यांचा पराभव केला. ९ सदस्यीय कवठाला ग्रामपंचायतध्ये ७ शेतकरी संघटना तर २ कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले असून सरपंच पदासाठी संघटनेच्या नरेश सातपुते यांनी कॉंग्रेसच्या देवराव ठावरी यांचा पराभव केला. ९ सदस्यीय येरगव्हान ग्रामपंचायतमध्ये कॉंग्रेस ४, भाजपा समर्थक ५ असे पक्षीय बलाबल आहे. सरपंचपदासाठी भाजपच्या सत्यवान आत्राम यांनी कॉंग्रेसच्या श्रीराम आत्राम यांचा पराभव केला. कोडशी कॉंग्रेस ७ व शेतकरी संघटना २ असे पक्षीय बलाबल असून सरपंचपदासाठी कॉंग्रेसच्या गिरजाबाई केराम यांनी शेतकरी संघटनेच्या अंजू गेडाम यांचा पराभव केला. ९ सदस्यीय निमणी ग्रामपंचायतमध्ये सर्व सदस्य कॉंग्रेसचे निवडून आले. तिरंगी लढतीत सरपंचपदासाठी कॉंग्रेस समर्थक सीमा शुद्धोधन जगताप यांनी शेतकरी संघटनेच्या शुभांगी शुक्राचार्य देठे व भाजपा समर्थक शिल्पा सुनील जगताप यांचा पराभव केला. कुकुडसाथ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सदस्यपदासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर नैताम मैदानात होते. शेतकरी संघटनेचे समर्थक कैलाश निळकंठ कोरंगे यांनी पराभव केला. तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पानिपत झाले असून खातेही उघडता आले नाही.